दातांची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करणं ही सगळ्यांसाठी महत्त्वाची सवय आहे. नियमित ब्रश करूनही काही जणांचे दात पिवळसर दिसतात. त्यामुळे अनेकांना दात पिवळे का होत आहेत, असा प्रश्न पडतो. दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश केला जातो, मग दातांचा रंग का बदलतो, असा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो. मात्र, दात पिवळे होण्यामागे फक्त तोंडाची स्वच्छता नसून अनेक कारणं असू शकतात.
तज्ज्ञांनी दात पिवळे होण्यामागची विविध कारणं सांगितली आहेत. वय वाढणं, आनुवंशिक कारणं, खाण्यापिण्याच्या सवयी, दातांची वाढ होत असतानाचे बदल, काही औषधं आणि धूम्रपान किंवा व्हेपिंगसारख्या सवयींमुळे दातांचा रंग बदलू शकतो.
म्हणजेच दात पिवळे होण्यासाठी एकच कारण जबाबदार नसतं. काही कारणं शरीराशी संबंधित असतात, तर काही आपल्या रोजच्या सवयींशी संबंधित असतात. त्यामुळे फक्त नियमित ब्रश केल्याने दातांचा पिवळेपणा पूर्णपणे दूर होईलच असं नाही. मात्र, दातांची स्वच्छता नीट न ठेवल्यास ही समस्या आणखी वाढू शकते.
दातांवरचा बाहेरचा थर म्हणजे इनॅमल. काही लोकांच्या दातांमध्ये हा थर नैसर्गिकरित्या पातळ असतो. त्यामुळे त्याच्या आत असलेला डेंटिन नावाचा थर दिसू शकतो. डेंटिनचा रंग पिवळसर असल्याने दातही पिवळसर दिसतात. वय वाढल्यानंतरही दातांचा बाहेरचा थर हळूहळू झिजतो. त्यामुळे आतला पिवळसर डेंटिनचा थर अधिक दिसू लागतो आणि दातांचा रंग बदलल्यासारखा वाटतो.
आपण रोज काय खातो आणि काय पितो, याचाही दातांच्या रंगावर परिणाम होतो. वारंवार कोल्ड ड्रिंक्स, रंगीत पदार्थ, चहा, कॉफी आणि वाइन घेतल्याने दातांवर डाग पडू शकतात. या पदार्थांचा दातांशी वारंवार संपर्क होत राहिल्यास त्यातील रंगद्रव्ये दातांच्या आतल्या थरांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे हे डाग नंतर काढणं अधिक कठीण होऊ शकतं.
तंबाखू आणि धूम्रपानामुळेही दात पिवळे होतात. तंबाखूमधील निकोटीन आणि टार दातांवर जमा होतात. त्यामुळे हट्टी डाग पडतात. असे डाग केवळ ब्रश केल्याने सहज निघत नाहीत. दातांवर टार्टर म्हणजेच कडक थर जमा झाल्यास तोही सामान्य ब्रशने निघत नाही. अशावेळी दातांची डेंटिस्टकडून प्रोफेशनल क्लिनिंग करून घेण्याची गरज असते.
दातांचा रंग बदलण्यामागे फक्त खाण्यापिण्याच्या किंवा जीवनशैलीच्या सवयी कारणीभूत नसतात. काही वेळा पर्यावरणाचाही त्यावर परिणाम होतो. भारतातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराइडचे प्रमाण जास्त असतं. लहानपणी विहिरीचं पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास फ्लोरोसिस होण्याची शक्यता असतं. त्यामुळे दातांच्या आतूनच रंग बदलू शकतो. अशा प्रकारचा पिवळेपणा किंवा डाग सामान्य स्वच्छतेने दूर होत नाहीत आणि त्यासाठी कॉस्मेटिक उपचारांची गरज भासू शकते.
काही औषधांमुळेही दातांवर परिणाम होऊ शकतो. टेट्रासायक्लिन आणि काही आयर्न सप्लिमेंट्स घेतल्यामुळे दातांचा रंग बदलू शकतो.
दाताला दुखापत झाल्यानंतरही त्या दाताचा रंग बदलू शकतो. अशा वेळी केवळ दात स्वच्छ केल्याने समस्या दूर होत नाही. दाताला झालेल्या दुखापतीनुसार विशेष उपचारांची गरज लागू शकते. काही प्रकरणांमध्ये रूट कॅनॉल उपचार करावा लागू शकतो.
दातांचा रंग का बदलला आहे, यावर उपचार ठरतात. दातांवर केवळ बाहेरून डाग पडले असतील तर प्रोफेशनल क्लिनिंग आणि ब्लिचिंग यामुळे दात स्वच्छ आणि अधिक पांढरे दिसण्यास मदत होऊ शकते. दातांचा रंग खूप जास्त बदलला असेल किंवा डाग सहज निघत नसतील तर व्हिनिअर्स, लॅमिनेट्स किंवा क्राउन यांसारखे कॉस्मेटिक उपचार डॉक्टर सुचवू शकतात. यामुळे दातांचा रंग सुधारण्यासोबतच दातांची रचना आणि दिसणंही सुधारण्यास मदत होते.
दातांचा रंग आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नियमित काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. तसेच वेळोवेळी दातांची तपासणी करण्यासाठी डेंटिस्टकडे चेकअप करून घ्यावा. यामुळे दातांशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येण्यास मदत होते. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवावं. दिवसभर पुरेसं पाणी प्यावं. चहा, कॉफी, रंगीत पदार्थ आणि दातांवर डाग पाडणाऱ्या पेयांचं प्रमाण कमी ठेवावं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.