बीड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे सिंदफणा नदीला अचानक महापूर आला. शिरापूर गाथ येथील रहींजवस्ती परिसरात अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले.
तब्बल दहा तासांहून अधिक काळ हे नागरिक पुराच्या घेरावात अडकले होते. या परिस्थितीत स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर स्वतः एनडीआरएफच्या पथकासोबत थेट नदीपात्रात उतरले आणि पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
एनडीआरएफच्या जवानांच्या साहाय्याने रात्रंदिवस सुरू असलेल्या या बचाव मोहिमेत अखेर सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. साम टीव्हीशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की, त्यांनी या संकटग्रस्त परिस्थितीची माहिती मिळताच पालकमंत्री अजित पवार यांच्याशी तातडीने संपर्क साधला.
अजितदादांनी त्वरित जिल्हाधिकारी तसेच शिरूर कासारचे तहसीलदार यांना सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाने समन्वय साधून ही मदत कार्यवाही सुरू केली.
पुरात अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन, एनडीआरएफ व स्थानिक लोक सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले.
अजित पवारांनी तातडीने मदतीसाठी पाठवलेल्या सूचनांमुळे हे काम शक्य झाले.