Rhiya Ahir: दिल्लीतील जंतरमंतरप्रमाणेच मुंबईतही नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर निर्भयपणे उभी राहून आंदोलक विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. ही तरुणी म्हणजे अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका रिया अहीर.
व्हायरल व्हिडिओमध्ये रिया अहीर पोलिसांची व्हॅन पुढे जाऊ न देण्यासाठी व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिल्याचे दिसते. व्हॅनमध्ये ताब्यात घेतलेले विद्यार्थी आंदोलक असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला बाजूला होण्यास सांगितले, मात्र रियाने त्यास नकार देत विद्यार्थ्यांना सोडण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया दादरमधील कोहिनूर स्क्वेअरवरून शिवाजी पार्कच्या दिशेने जात असताना तिला आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन दिसली. त्यानंतर ती थेट व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली आणि पोलिसांशी चर्चा केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना थोड्या अंतरावर सोडणार असल्याचे सांगितले असता, रियाने त्यांना तिथल्या तिथेच सोडण्याची मागणी केली. अखेर काही वेळानंतर विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर रियाच्या धाडसाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
रिया सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसते. तिने माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. "जर पोलीस नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असतील, तर नागरिकांनीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे," असे तिचे म्हणणे आहे.
तिने पुढे असेही सांगितले की, "मी दलित नाही, ओबीसी नाही आणि माझे वडील शेतकरीही नाहीत. तरीही विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई चुकीची वाटत असल्याने मी त्यांच्या समर्थनार्थ उभी राहिले." तिच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून, अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
रिया यादव ही अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिलबारा' या गाण्यातही ती झळकली होती. अभिनयासोबतच ती उद्योजिका असून 'रियासत (Rhiyasat)' या नावाने हाताने तयार केलेल्या कपड्यांचा ब्रँड चालवते. तिला डान्सचीही विशेष आवड आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.