टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात २ महिलांसह चार आरोपींना अटक
या गोळीबार प्रकरणात दिल्ली कनेक्शन उघड
अमृतसरमधून पिस्तूल आणि २० काडतुसे आणल्याचा आरोप
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शस्त्र पुरवठ्याच्या साखळीबाबत पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन महिलांसह चार जणांना ताब्यात घेतले असून महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाने न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना या प्रकरणात औपचारिक अटक केली आहे. आरोपींना मुंबईत आणून चौकशी करण्यासाठी न्यायालयाने ३ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २० ऑक्टोबर २०२६ रोजी कुनाल (वय २१ वर्षे), सुमित (वय १९ वर्षे), राधा (वय २३ वर्षे) आणि बबिता (वय २३ वर्षे) यांच्यावर कारवाई केली. कुनाल आणि सुमित हे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील असून राधा उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील, तर बबिता आझमगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी चौघांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(१)(ब) अंतर्गत न्यायालयात हजर केले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी, मुंबई पथकाने आरोपींची कोठडीत चौकशी करण्याची आणि या प्रकरणात औपचारिक अटक करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ही मागणी मंजूर केली. पुढील तपासासाठी आरोपींना मुंबईत आणण्याकरिता मागितलेला तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांडही मंजूर करण्यात आला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमानुसार, कुनाल हा नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्रामार्फत त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये एन्क्रिप्टेड अॅपच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. अनिल पंडितच्या कथित निर्देशानुसार, कुनालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० काडतुसे आणल्याचा आरोप आहे. यावेळी सुमित त्याच्यासोबत होता. या शस्त्राचा टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. शस्त्र कुणाकडून मिळाले, ते मुंबईत कसे पोहोचले आणि गोळीबार करणाऱ्यांपर्यंत ते कसे गेले? याचा तपास केला जात आहे.
तपासातील माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुनालची राधाशी ओळख झाली होती. कुनालने तिला आपल्या कथित कारवायांची माहिती दिली आणि तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यासाठी त्याने राधाला तयार केल्याचा आरोप आहे. १५ ऑक्टोबर रोजी कुनालने राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोडले. राधाच्या बॅगेत पिस्तूल ठेवण्यात आले होते, असा तपासातील घटनाक्रमात उल्लेख आहे. प्रवासादरम्यान कुनाल एन्क्रिप्टेड अॅपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात होता. अनिल पंडितकडून मिळणाऱ्या सूचना तो महिलांपर्यंत पोहोचवत असल्याचा आरोप आहे.
१७ ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता दादर येथे उतरल्या आणि एका हॉटेलमध्ये थांबल्या. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतल्याचा आरोप आहे. या बॅगेतील शस्त्र पुढे गोळीबार करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचले का, तसेच या मुलाची नेमकी भूमिका काय होती, याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर अनिल पंडितने कुनालशी संपर्क साधला. गोळीबार करणारे आरोपी मुंबईत अडकले असल्याचे सांगून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यास अनिल पंडितने सांगितल्याचा उल्लेख दिल्ली पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमात आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजीच राधा आणि बबिता दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. २० ऑक्टोबर रोजी त्यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. त्याच दिवशी कुनाल आणि सुमित यांनाही हरियाणातील सोनीपत येथे पकडण्यात आले.
या प्रकरणात शस्त्राची खरेदी, अमृतसरमधून त्याची वाहतूक, महिलांमार्फत मुंबईत आणणे आणि त्यानंतर अल्पवयीन मुलाकडे बॅग सोपवणे, या घटनांचा तपास केला जात आहे. एन्क्रिप्टेड अॅपवरील संवाद आणि आरोपींमधील संपर्कांची पडताळणीही तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते. चार आरोपींना औपचारिक अटक करण्यात आली असली, तरी गोळीबार करणाऱ्या व्यक्तींची ओळख, शस्त्र पुरवठा साखळीतील प्रत्येकाची नेमकी भूमिका आणि कथित कटामागील इतर व्यक्तींबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.