'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवर कामगाराचा मृत्यू
भन्साळी प्रॉडक्शन्स नुकसान भरपाई करणार
आलिया भट्ट, विकी कौशल, रणबीर कपूर चित्रपटात मुख्य भूमिकेत
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' (Love & War) या चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. १७ जूनच्या पहाटे मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील 'रॉयल पंप स्टुडिओ'मध्ये या चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना ४२ वर्षीय सुतार चंद्रधारी यादव यांचा मृत्यू झाला.
'फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन'च्या (FSSAMU) प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु प्राथमिक अहवालांनुसार शॉर्ट सर्किटमुळे बसलेल्या विजेच्या धक्क्यामुळे (electric shock) हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मृत्यूचे नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर उघड होईल.
चंद्रधारी यादव यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. या घटनेनंतर, 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) आणि FSSAMU ने 'लव्ह अँड वॉर'च्या निर्मात्यांशी संपर्क साधून यादव यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत आणि आधार देण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने यादव यांच्या कुटुंबाला ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी म्हणाले की, "आर्थिक नुकसान भरपाईव्यतिरिक्त आम्ही निर्मात्यांकडे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आहे. कामगारांकडून अनेकदा ठरवून दिलेल्या आठ ते दहा तासांच्या मर्यादेपेक्षा खूप जास्त वेळ काम करून घेतले जाते; परंतु कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या स्वतःला किती ताण देऊ शकते यालाही एक मर्यादा असते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील पावले उचलण्याबाबत निर्णय घेऊ. निर्माता कितीही मोठा असो किंवा चित्रपट कितीही मोठा असो, कामगारांचे प्राण धोक्यात घालता येणार नाहीत."
FWICE चे मानद सरचिटणीस अशोक दुबे यांनी सांगितले की, "चंद्रधारी यादव गेल्या तीन दिवसांपासून सेटवर सतत काम करत होते आणि ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी ते सकाळी ७ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत काम करत होते. तिथे उपस्थित असलेल्यांच्या माहितीनुसार, त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला...फेडरेशनने संबंधित प्रॉडक्शन हाऊसमध्ये यादव यांच्या पत्नीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे..."