Marathi Celebrity Post: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. आज दुपारी अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय महाभूकंपावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. सोबतच आता महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपावर अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी, अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित, गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणतात, “महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट.. भा.ज.पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा.ज.पा.तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो....)” अशी पोस्ट करत सचिन गोस्वामींनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर टिका केली आहे. ही फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी सचिन गोस्वामींनी केलेल्या पोस्टला सहमती दर्शवलीय.
तर मराठी अभिनेत्री- निर्माती तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने देखील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटरवर पोस्ट करत अभिनेत्री म्हणते, “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!.” असं एका ट्वीटमध्ये म्हणाली आहे. तर आणखी एका ट्वीटमध्ये तेजस्विनी म्हणते, “तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “राज” करावं !!!- महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक” असं म्हणत तिने म.न.से. अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून पोस्ट लिहीली आहे.
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धी झोतात आला. उत्कर्ष शिंदेने महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर दोन पोस्ट केल्या आहेत. त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये उत्कर्ष शिंदे म्हणतो, ‘मतदारांच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना’ अशी खरपूस टिका अभिनेत्याने केली आहे. तर दुसऱ्या स्टोरीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एक फोटो शेयर केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी आपल्या 35 आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज दुपारी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आज दुपारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली असून इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. महाराष्ट्रामध्ये आधी दोन पक्षाचं सरकार होतं, परंतू आता तीन पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे.
रविवारी मुंबईतील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.