मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या चर्चेत आली आहे. तेजस्विनी पंडीतने आपल्या उत्कृष्ट आणि दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तेजस्विनी मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवून आणणार आहे. तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही एन्ट्री केली आहे. आता तेजस्विनी पंडित लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तेजस्विनीने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने तेजस्विनी पंडितचा मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम आता सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे हे नक्की आहे.
आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवाला म्हणतात की, 'मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ मिळाली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.'
तेजस्विनी पंडितने सांगितले की, 'ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो.
आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी 'गेम चेन्जर' ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत.' अशामध्ये आता तेजस्विनी आणि साजिद नाडियाडवाला प्रेक्षकांच्या भेटीला नेमका कोणता चित्रपट घेऊन येणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.