मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजित रवी याला अल्पवयीन मुलांशी संबंधित पॉक्सो प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात त्रिशूर येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने त्याला एक वर्षाच्या सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. २०२२ मध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित हे प्रकरण असून, अभिनेत्याने अल्पवयीन मुलांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ४ जुलै २०२२ रोजी ही घटना घडली होती. काही अल्पवयीन मुले शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी परतत होती. ही मुले ज्या अपार्टमेंट परिसरात राहत होती, त्याच ठिकाणी अभिनेता श्रीजित रवीने त्यांच्यासमोर आपले प्रायव्हेट पार्ट उघड केल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर त्याने मुलांना धमकावल्याचाही आरोप होता. या घटनेनंतर संबंधित मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. या प्रकरणात अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
त्रिशूर येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या न्यायाधीश रेम्या मेनन यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने श्रीजित रवी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ११(i) अंतर्गत दोषी ठरवले. त्यानुसार त्याला एक वर्षाच्या सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.जर अभिनेत्याने हा दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
न्यायालयाचा निकाल आल्यानंतर श्रीजित रवी याने केरळ उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या शिक्षेला एक महिन्यासाठी स्थगिती दिली आणि जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांचा वैयक्तिक बॉण्ड आणि दोन सक्षम जामीनदारांच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे. तसेच २३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणात श्रीजित रवी याने २०२२ मध्येच खटल्यातून मुक्त करण्यासाठी (Discharge Petition) न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर त्याने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्याचे अपील दाखल करून घेतले होते; मात्र नंतर ते फेटाळण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. खटल्यादरम्यान एकूण २१ साक्षीदारांनी साक्ष दिली. या साक्षीदारांच्या जबाबांनंतर न्यायालयाने अभिनेत्याला दोषी ठरवले.
श्रीजित रवी हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील ओळखीचा अभिनेता आहे. तो ज्येष्ठ अभिनेते टी. जी. रवी यांचा मुलगा आहे. वयाच्या ५० व्या वर्षीही तो चित्रपटसृष्टीत सक्रिय असून, २००५ पासून त्याने मल्याळम चित्रपटांसोबतच तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, आता पॉक्सो प्रकरणातील न्यायालयाच्या निकालामुळे तो चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.