मार्च महिना सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरणार आहे. या महिन्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवाणी असणार आहे. या महिन्यामध्ये अनेक चांगल्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मार्चच्या पहिल्याच तारखेला अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचसोबत या पूर्ण महिनाभरामध्ये देखील अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात कोणते चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे आपण पाहणार आहोत...
किरण रावचा 'लपता लेडीज' हा चित्रपट १ मार्चला म्हणजे आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे किरण रावने 13 वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. आमिर खानने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. यामध्ये चालत्या ट्रेनमध्ये दोन वधूंची अदलाबदल केली जाते. या चित्रपटामध्ये नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांचा बहुप्रतिक्षीत ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट १ मार्चला म्हणजे आज प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अनेक ॲक्शन आणि एरियल सीन्स पाहायला मिळत आहेत. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ची घोषणातुलना ‘फायटर’शी केली जात आहे. या चित्राची कथा बालाकोट एअरस्ट्राईकवर आधारित आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, आर माधवनचा 'शैतान' चित्रपट 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा खूपच मनोरंजक आहे. हा चित्रपट गुजराती चित्रपट 'वश' चा रिमेक आहे.
'तेरा क्या होगा लवली' या चित्रपटाची टक्कर अजय देवगणच्या 'शैतान'सोबत होणार आहे. हा चित्रपट 8 मार्चला रिलीज होणार आहे. या रोमँटिक-व्यंगचित्रपटात रणदीप हुड्डासोबत इलियाना डिक्रूझ दिसणार आहे. या चित्रात लग्नघरातून हुंडाचोरीची कहाणी दाखवली जाणार आहे. रणदीप इन्स्पेक्टर सोमवीर सांगवानच्या भूमिकेत आहे. जो हे प्रकरण सोडवताना दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री दिशा पाटनी आणि राशि खन्ना सध्या त्यांच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. तिघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सागर आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित या चित्रपटात दिशा पटानी आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. 15 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्राची कथा विमान हायजॅकची आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे.
'द केरळ स्टोरी' अभिनेत्री अदा शर्मा आता 'बस्तर'मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती नक्षलवादाचा प्रश्न मांडताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये अदा आयपीएस अधिकारी नीरजा माधवनच्या भूमिकेत आहे. यामध्ये त्या गावकऱ्यांची कहाणी दाखवली जात आहे. जे नक्षलवादाच्या समस्येने त्रस्त आहेत. चित्रपटातील संवाद जबरदस्त आहेत. विपुल अमृतलाल शाह त्याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीपनो सेन यांनी केले आहे. हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो वीर सावरकरांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रणदीपने स्वतः या बायोपिकचं दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेचीही एन्ट्री झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट 'क्रू' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आला. ज्यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती एअर होस्टेसच्या नोकरीमुळे त्रस्त असल्याचे दिसत आहेत. यामध्ये तब्बूची डॅशिंग स्टाइल पाहायला मिळतेय. चित्रपटाची कथा केवळ रंजकच नाही तर तिन्ही व्यक्तिरेखाही छान दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.