मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बांगलादेशी लोकप्रिय अभिनेता सोहेल खान (Sohel Khan) यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बांगलादेशी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोगुरा येथे गेले असताना हॉटेलमधून बाहेर पडताना ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
thedailystar ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास टीएमएसएस मेडिकल कॉलेज रुग्णालयातील डॉक्टरांनी सोहेल खान यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोहेल खान हे आगामी 'नसीब' (Naseeb) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी १८ नोव्हेंबर रोजी बोगुरा येथे पोहोचले होते. १९ नोव्हेंबरपासून ते चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते एमडी इक्बाल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सोहेल यांनी शूटिंगसाठी जाण्याची तयारी केली होती. मेकअप पूर्ण करून ते सेटवर जाण्यासाठी हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडत होते. त्याचवेळी अचानक ते खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच चित्रपटाच्या टीममधील सदस्यांनी त्यांना तातडीने वैद्यकीय मदत केली.
चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी असलेले अभिनेते शरियार नाझिम जॉय यांनी सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टमधून या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोहेल खान यांनी शूटिंगला जाण्यासाठी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट परिधान केली होती. त्यांना घेण्यासाठी हॉटेलच्या खाली गाडीही तयार होती. सकाळी साधारण ९ वाजता त्यांनी नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट खाल्ले होते. त्यामुळे सुरुवातीला काही जणांना त्यांना त्या फळाची अॅलर्जी किंवा रिॲक्शन झाली असावी, असा संशय आला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर सोहेल खान यांना तातडीने टीएमएसएस मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते एमडी इक्बाल यांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे पार्थिव धामराई, सावर येथील निवासस्थानी नेण्यात येणार असल्याचे सांगितले. कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
सोहेल खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका टेलिव्हिजन जाहिरातीपासून केली होती. ते पहिल्यांदा बांगलालिंकच्या जाहिरातीतून प्रेक्षकांसमोर आले. त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या '४२०' या राजकीय व्यंगात्मक मालिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या मालिकेनंतर सोहेल यांनी अनेक टेलिव्हिजन नाटके, मालिका आणि टेलिफिल्ममध्ये काम केले. 'एमोन देशती कोथाओ खुजे पाबे नाको तुमी', 'भालोबाशार जॉइंटो खामार' आणि 'निमंत्रण रोइलो शोबार' हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रोजेक्ट होते. 'निमंत्रण रोइलो शोबार'मध्ये त्यांनी वडिलांची भूमिका साकारली होती.
सोहेल खान यांना शेवटचे २०२५ प्रदर्शित झालेल्या 'जंगली' या चित्रपटात दिसले. त्यानंतर ते 'नसीब' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.अशाप्रकारे शूटिंगसाठी गेलेल्या अभिनेत्याचा अचानक मृत्यू झाल्याने बांगलादेशी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे सहकलाकार, चित्रपट निर्माते आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.