Amitabh Bachchan Threat: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लों याच्या नावाने सोशल मीडियावर एक धमकीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही अभिनेत्यांना कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केले, तरी त्यांच्यावर हल्ला करू, अशी धमकी या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मुंबईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन शूटर्सना अटक केल्यानंतर ही पोस्ट समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पोलिसांकडून पोस्टची सत्यता तपासण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईत कारवाई करत विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोन शूटर्सना अटक केली आहे. या कारवाईनंतर गोल्डी ढिल्लोंच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये दोन्ही आरोपींना इतर कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी जोडू नये.तसेच या दोघांना अटक झाल्याने कोणताही कट उधळला गेलेला नाही. मुंबईत आमचे आणखी २०० जण तयार आहेत, असा उल्लेख करून धमकी देण्यात आली आहे.
या पोस्टमधील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना देण्यात आलेली धमकी. दोघांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केले, तरी त्यांच्यावर हल्ला करू, असा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर केबिनमध्येच त्यांना मारण्याची धमकीची भाषा वापरण्यात आली आहे.
गोल्डी ढिल्लोंच्या नावाने करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये शीख समाजाविरोधात बोलणाऱ्यांना आपला शत्रू मानणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पोस्टमध्ये #JusticeOf1984 आणि #GoldyDhillonGroup यांसारख्या हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या धमकीमागील नेमका उद्देश काय, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, ही फेसबुक पोस्ट नेमकी कुठून करण्यात आली आणि ती खरोखरच गोल्डी ढिल्लोंशी संबंधित आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या पोस्टमधील धमक्यांना गांभीर्याने घेत तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.