Sonu Sood Helps Flood Victims in Andhra And Telangana : कोविड महामारीच्या काळातील लॉकडाउन असो वा शिक्षणापासून वंचित असणारी गरीब मुलं. अभिनेता आणि गरिबांचा 'मसिहा' अशी ओळख असलेला सोनू सूद नेहमीच मदतीला धावतो. हाच सोनू आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला तुफान पावसानं झोडपलंय. पुराच्या पाण्याचा वेढा काही भागांना बसलाय. रस्ते, घरं, शेती पाण्याखाली गेलीय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला गेलाय. संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पूरग्रस्तांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चर्चेतील नावं देखील आहेत. पण गोरगरिबांना जमेल तशी मदत करणारा सोनू सूद आता आंध्र आणि तेलंगणातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला आहे.
सोनू सूद यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना पुन्हा त्यांची घरे उभी करायला आपण मदत करू, त्यांचं जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्व जनतेने एकत्र आलं पाहिजे. तसंच जितकी मदत करता येईल तितकी मदत केली पाहिजे. सर्व लोक तुमच्यासोबत आहेत' अशा शब्दांत सोनू सूद यानं पूरग्रस्तांना धीर दिला.
सोनू सूदला लोक रील आणि रीअल लाइफमधलाही हिरो म्हणतात. त्याच्या मदत करण्याच्या स्वभावामुळेच सोनू सूदला मसिहा म्हणून ओळखलं जातं. लॉकडाउनच्या काळात त्यानं मदत केल्याचं सर्वांनीच बघितलं. गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करतो. आता तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरपीडितांच्या मदतीला धावून गेला आहे. तिथल्या लोकांना त्यानं अन्न, शुद्ध पाणी, वैद्यकीय कीट, राहण्यासाठी तात्पुरती सुविधा आदी मदत केली आहे. त्याची संपूर्ण टीम हे काम करत आहे.
सध्या सोनू सूदचा 'फतेह' हा सायबर क्राइम आणि अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यानं केलं आहे. त्यामुळं प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. यात नसिरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.