Saif Ali Khan Death Threat: बॉलिवूडमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. आधी सलमान खानला धमकी नंतर टायगर शॉफवर हल्ला त्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनला जीवे मारण्याच्या धमकीमुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यात आता अभिनेता सैफ अली खानला देखील धमकी मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या प्रकरणामुळे मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
झिशान अख्तरच्या नावाने धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खान याला झिशान अख्तरच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान अख्तरचे नाव समोर आले होते. या प्रकरणातील तो फरार आरोपी आहे. आता त्याच्याच नावाने सैफ अली खानला धमकी मिळाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. धमकीचा स्रोत आणि त्यामागील व्यक्ती कोण आहे, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.
यापूर्वी या कलाकारांनाही मिळाल्या होत्या धमक्या
गेल्या काही काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कलाकारांना धमक्या देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
AI च्या मदतीने धमकी दिल्याचा आरोप
दरम्यान, या प्रकरणांशी संबंधित धमकीच्या एका वेगळ्या तपासात मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून वैभव मिश्रा (३०) याला अटक केली आहे. वैभव मिश्रा हा आयआयटी पदवीधर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र, त्याचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सैफ अली खानला मिळालेल्या धमकीमागे नेमके कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. झिशान अख्तरचे नाव वापरून धमकी देण्याचा उद्देश काय होता, याचाही तपास केला जात आहे. तसेच या धमकीचा वैभव मिश्रा याच्या अटकेशी काही संबंध आहे का? याचाही पोलिस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.