दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे... परदेशी नागरिकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २० आरोपींना अटक करण्यात आली असून, ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा शहरातील नांगरगाव परिसरात सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेसह कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या कारवाईमुळे परदेशी नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर फसवणुकीचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगरगाव परिसरातील ओमेगा सोसायटीमधील एका ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकून ही धाडसी कारवाई केली.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, तेथे अनेक जण संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून काम करत असल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान हे ठिकाण कॉल सेंटर म्हणून चालवले जात असल्याची माहिती समोर आली. या गुन्ह्यात फसवणुकीसाठी बनावट ओळखीचा वापर करण्यात येत होता तर कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून परदेशी नागरिकांशी इंग्रजी भाषेत संपर्क साधला जात होता. नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून लक्ष्य केले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात बनावट ई-मेल आयडी, बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रांचा वापर करून प्रतिनिधी असल्याचे भासवले जात असल्याचेही पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची बँकविषयक माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डशी संबंधित माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. मात्र, या संपूर्ण व्यवहारामध्ये नेमकी किती रक्कम फसवणुकीतून मिळवण्यात आली, किती नागरिकांची फसवणूक झाली आणि या रॅकेटचे आणखी कोणाशी संबंध आहेत, याचा तपास होणे बाकी आहे.
यात २० आरोपींना अटक केली असून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाप्यादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहने असा एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच परदेशी नागरिकांना लक्ष्य करून बनावट ओळख, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार किती गंभीर होत आहेत, हे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार, फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांची संख्या आणि या रॅकेटमागील सूत्रधार कोण आहेत, याचा उलगडा तपासातूनच होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे. लोणावळ्यातील या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.