आज सकाळी गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात या मृत्यूमागे शक्तीवर्धक औषधांच्या ओव्हरडोजचा संबंध असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही घटना हरियाणातील गुरुग्राममधील सेक्टर 53 परिसरात घडली. या ठिकाणी भाड्याच्या पीजी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला. हा तरुण नागपूरचा रहिवासी होता आणि तो नवी दिल्लीत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कार्यालयात नोकरी करत होता.
गुरुवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाला. या तरुणाचा एक सहकारी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. हा तरुण त्याच्या ऑफिसमध्ये असून ते दोघे नेहमी सोबत ऑफिसला जात असत. मात्र त्या दिवशी मृत तरुणाने फोन उचलला नाही आणि तो दरवाजाही उघडत नव्हता. त्यामुळे सहकाऱ्याला संशय आला. सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून त्याने अनेकदा फोन केला. पण काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सुमारे 9 वाजता तो काही मित्रांसोबत त्याच्या फ्लॅटवर पोहोचला.
दरम्यान, मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडूनही संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. सकाळी सुमारे 10:05 वाजता पोलिसांना फोन करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर तरुण बिछान्यावर चादर ओढून मृत अवस्थेत आढळला. खोलीत जबरदस्तीने कोणी शिरल्याचे संकेत दिसले नाहीत.
तपासादरम्यान पोलिसांना खोलीत काही शक्तीवर्धक गोळ्यांचे आणि हेल्थ सप्लिमेंट्सचे रॅपर्स सापडले. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी काही गोळ्या घेतल्या असाव्यात. त्याची मात्रा जास्त झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने आपल्या मंगेतरला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र ती येण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि तो तिच्या भेटीची वाट पाहत होता, अशीही माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळावरून मिळालेल्या गोळ्यांचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
सेक्टर 53 पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पोलिस सर्व शक्य शक्यतांचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.