Can ancestral property be sold without a sister's consent in India saam tv
बिझनेस

Property Rules: बहिणीच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित जमीन विकली, तुमच्यावर काय कारवाई होणार? कायदा काय सांगतो

Ancestral Property Dispute: बहिणीच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित जमीन विकता येते का? मुलींचा मालमत्तेतील हक्क, जमीन विक्रीला आव्हान देण्याचे पर्याय आणि कायदेशीर कारवाई याविषयी जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • मुलीला वडिलोपार्जित सहदायिकी मालमत्तेत मुलाप्रमाणे हक्क मिळू शकतो.

  • सातबारा, फेरफार नोंदी, विक्रीखत आणि वाटणीपत्र तपासणे आवश्यक आहे.

  • केवळ विवाहामुळे लागू कायद्यानुसार मिळणारा वारसाहक्क संपत नाही.

गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांनी या प्रश्नाला एक नवी आणि स्पष्ट दिशा दिली आहे. जर कुटुंबातील संपत्ती मुलींच्या नकळत विकली गेली असेल, तर तिला कायदेशीर मार्गाने कसे आव्हान देता येऊ शकते? याविषयीची संपूर्ण माहिती प्रत्येक मुलीला आणि कुटुंबाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

संपत्तीचे प्रकार कोणते?

कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी, विकली गेलेली संपत्ती नेमकी कोणत्या श्रेणीतील आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. भारतीय कायद्यानुसार संपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात:

वडिलोपार्जित संपत्ती (Ancestral Property):

ही ती संपत्ती आहे जी पिढ्यान् पिढ्या (पणजोबा, आजोबा किंवा वडिलांकडून) वारसाहक्काने मिळते. कुटुंबातील प्रत्येक कायदेशीर वारसाचा अशा संपत्तीवर जन्मापासूनच अधिकार असतो. तर दुसरा प्रकार हा स्व-अर्जित संपत्ती (Self-acquired Property) आहे. ही संपत्ती आहे जी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने, बचतीने किंवा वैयक्तिक उत्पन्नातून खरेदी केली आहे.

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचे अधिकार काय आहेत?

हिंदू उत्तराधिकार (संशोधित) अधिनियम, २००५ आणि 'विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानुसार, मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलांच्या समानच अधिकार प्राप्त आहेत. संपत्तीच्या विभागणीच्या वेळी वडील हयात असोत वा नसोत, मुलीला तिचा हिस्सा मिळालाच पाहिजे. विशेष म्हणजे, मुलीचे लग्न झाले तरी तिच्या मालमत्तेच्या अधिकारात कोणताही फरक पडत नाही.

संमतीशिवाय विक्री केल्यास कायदेशीर परिणाम काय?

जर मुलीची संमती किंवा स्वाक्षरी घेतल्याशिवाय पैतृक संपत्ती विकली गेली, तर तिच्या हिश्श्यापुरती ती विक्री कायदेशीरदृष्ट्या वैध ठरत नाही. अशा प्रकरणात मुलगी न्यायालयात जाऊन आपल्या कायदेशीर हिश्श्याची मागणी करू शकते.

स्व-अर्जित संपत्तीचे नियम काय सांगतात?

स्व-अर्जित संपत्तीच्या बाबतीत नियम थोडे वेगळे आहेत. जर वडिलांनी ती संपत्ती स्वतःच्या पैशाने खरेदी केली असेल, तर त्यावर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. ते आपल्या इच्छेनुसार ती संपत्ती कोणालाही विकू शकतात किंवा गिफ्ट डीडद्वारे (Gift Deed) दान करू शकतात. अशा प्रकरणात मुली किंवा इतर वारसांच्या सह्यांची सक्ती नसते. परंतु, जर वडील कोणतेही मृत्यूपत्र न करता अचानक मरण पावले, तर मात्र मुलीला त्यांच्या स्व-अर्जित संपत्तीतही समान हिस्सा मिळतो.

संपत्ती आधीच विकली गेली असेल, तर मुलींनी काय करावे?

जर तुमच्या स्वाक्षरीशिवाय वडिलोपार्जित संपत्तीची विक्री झाली असेल, तर तुम्ही खालील कायदेशीर पावले उचलू शकता

कायदेशीर नोटीस:

वकीलामार्फत संपत्ती खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आणि ती विकणाऱ्या कुटुंबीयांना कायदेशीर नोटीस पाठवा. यामध्ये स्पष्ट नमूद करा की, हा व्यवहार माझ्या संमतीशिवाय झाल्यामुळे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

संपत्तीच्या वाटपाचा दावा

दिवाणी न्यायालयात संपत्तीच्या कायदेशीर विभाजनासाठी दावा दाखल करा. संपत्ती विक्री झाल्यापासून १२ वर्षांच्या आत ही कारवाई केल्यास केस जिंकण्याची शक्यता सर्वाधिक असते.

खरेदीदारांसाठी महत्त्वाचा इशारा:

जर एखादी वडिलोपार्जित संपत्ती मुलीच्या स्वाक्षरीशिवाय खरेदी केली गेली, तर न्यायालय भविष्यात ती विक्री रद्द करू शकते किंवा खरेदीदाराला भरपाईच्या स्वरूपात मुलीला विक्रीतून मिळालेल्या रकमेतील तिचा हिस्सा देण्याचे आदेश देऊ शकते.

लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट :

त्यागपत्र: एकदा तुम्ही कोणत्याही संपत्तीवरील आपल्या अधिकाराचा औपचारिक त्याग करून त्यागपत्रावर स्वाक्षरी केली, तर तुम्ही भविष्यात त्या संपत्तीवर दावा करू शकत नाही.

वेळेची मर्यादा :

संपत्ती विक्रीची माहिती मिळताच क्षणी त्वरित कायदेशीर पावले उचला. अनेक वर्षे (सामान्यतः १२ वर्षे) उशीर केल्यास तुमची कायदेशीर बाजू कमकुवत होऊ शकते.

मालमत्ता प्रमाणपत्राची (सातबारा) पडताळणी:

कोणत्याही मोठ्या वादात पडण्यापूर्वी जमिनीचे मालकी प्रमाणपत्र (सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड) आवर्जून तपासा. त्यावर सध्या कोणाचे नाव आहे याची खात्री करा. जर तुमच्या स्वाक्षरीशिवाय ती विकली गेल्याचे निष्पन्न झाले, तर विनाकारण भांडत बसण्यापेक्षा वकीलाच्या माध्यमातून खरेदीदाराला नोटीस पाठवा. यामुळे खरेदीदार त्या संपत्तीवर कर्ज घेऊ शकणार नाही किंवा ती पुढे विकू शकणार नाही.

भारतीय कायद्याने मुलींना अत्यंत भक्कम अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणीही तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीच्या हक्कापासून व अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. आपल्या हक्कांबद्दल नेहमी जागरूक राहणे आणि अन्याय झाल्यास कायदेशीर लढा देण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हजारो शिक्षक मतदानापासून वंचित, मतदार यादीतून झाली नावे गायब

Washing machine detergent: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट वापरावं? अनेकांकडून होते 'ही' चूक

Farmers Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

5 Best Drink To Control Blood Sugar: ड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ५ ड्रिंक सर्वात बेस्ट, कधी आणि कसे प्यावे?

Transfer News : रातोरात मोठे प्रशासकीय फेरबदल! मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून १४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT