ई-केवायसी (e-KYC) नंतर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील अनेक अपात्र महिलांचा लाभ बंद झाला आहे. काही पुरुषांनी आणि महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे ई-केवायसीमधून उघड झाल्यानंतर, सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या सर्वांकडून आता घेतलेल्या पैशांची वसुली केली जाणार असून, तशी यादी महिला व बालविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. या यादीतील नावांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार असून, त्यानंतर त्यांच्याकडून पैसे परत (माघारी) घेतले जाणार आहेत.
एकट्या सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणाऱ्यांची संख्या १९०७ इतकी असल्याचे ईकेवायसीतून समोर आले. या सर्वांची नावे आण कर्मचाऱ्यांच्या सरकारी विभागाची नोंद करण्यात आली आहे. फक्त सोलापूर जिल्ह्यातील ६३ पानांची यादी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पाठविली आहे. या सर्वांची पडताळणी होणार आहे. सध्या त्या सर्वांचा थांबविण्यात आल्याचेही आदेशात स्पष्ट सांगण्यात आलेय.
सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची यादी संबधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लाभ घेतलेल्या त्या सर्व नावांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. ‘महाआयटी’कडून झालेल्या पडताळणीत लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांची पडताळणी तातडीने करून अहवाल सादर करावा, असे आदेश महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आले आहेत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता व निकष
रहिवास: अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
वय मर्यादा: महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे (विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला पात्र).
उत्पन्न मर्यादा: महिला अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
बँक खाते: अर्जदार महिलेचे स्वतःच्या नावावर बँक खाते असणे अनिवार्य आहे आणि ते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeded) असणे आवश्यक आहे.
अपात्रतेचे निकष (कोण पात्र असणार नाही?)
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त आहे.
ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित/कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरीत कार्यरत आहे किंवा निवृत्तीवेतन (Pension) घेत आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर (Income Tax) भरतात.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत आहे.
ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेद्वारे दरमहा ₹१,५०० किंवा त्याहून अधिक आर्थिक लाभ घेत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष ठरलेले आहेत. पण अपात्र असतानाही अनेकजण योजनेचा लाभ घेत आहेत. कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असतानाही काही जण योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीत आढळलेय. त्यानुसार महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी त्या लाभार्थींची यादी पाठवली असून, आता त्यांची पडताळणी होणार आहे.- अविनाश मगर, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
सोलापूरमधील ७८ पुरुष लाभार्थींना नोटिसा अन्...
लाभार्थींची ई-केवायसी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने सर्व लाभार्थींची पडताळणी केली. एकट्या सोलापूर जिल्ह्याच्या लाभार्थींमध्ये १९०७ सरकारी नोकरदार आणि ७८ पुरुष आढळून आले आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत या सर्वांची अंतिम पडताळणी केली जाणार आहे. तूर्तास, यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. पडताळणीच्या अहवालानंतर या अपात्र लाभार्थींनी आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.