Parking space transfer after flat purchase : नवीन किंवा जुना फ्लॅट खरेदी करताना पार्किंगची जागा आपल्या नावावर झाली आहे की नाही? हे तपासले नाही तर मोठा फटका बसू शकतो. होय, कारण मुंबईतील एका प्रकरणामुळे सर्वांनाच धडा मिळाला आहे. सांताक्रूझमधील एका गृहनिर्माण संस्थेत जुन्या मालकाकडून एका व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला, पण त्यानंतर पार्किंगवरून वाद सुरू झाला. हा पार्किंगच्या जागेचा वाद थेट कोर्टात पोहोचला. पण महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अपिलेट कोर्टाने घरखरेदीदाराच्या विरोधात निकाल देत शेजाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. (Housing society parking rules) economictimes ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मूळ मालकाला मिळालेली पार्किंगची जागा नवीन खरेदीदाराकडे आपोआप वर्ग (Transfer) होत नाही, असा महत्त्वाचा नियम सांगत कोर्टाने त्या खरेदीदाराची याचिका फेटाळून लावली. जुन्या मालकाचे पार्किंग थेट वापरल्यामुळे आणि सोसायटीकडून नवीन परवानगी (Allotment) न घेतल्यामुळे, शेजाऱ्याने जबरदस्तीने आपली दुसरी गाडी तिथे पार्क केली तरीही या खरेदीदाराला कायदेशीर दिलासा मिळू शकला नाही. गृहनिर्माण संस्थांच्या उपविधीनुसार (Bye-laws) जुना मालक पार्किंग विकू किंवा ट्रान्सफर करू शकत नाही, त्यामुळे सोसायटीमध्ये फ्लॅट घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा कोर्टाचा निकाल मोठा धडा ठरत आहे. (Flat buyer parking allotment guidelines)
मुंबईतील सांताक्रूझ (पश्चिम) येथील एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पार्किंगच्या वादाचं प्रकरण आपल्या सर्वांसाठीच एक धडा ठरला आहे. ढोलकिया दाम्पत्याने २००७ मध्ये या सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या मालकासाठी राखीव असलेली तीच पार्किंगची जागा वापरली. फ्लॅट खरेदी करताना पार्किंगची जागा आपोआप त्यांच्याकडे हस्तांतरित झाली असेल, असा त्यांचा विश्वास होता. पण २०२१ मध्ये एका शेजाऱ्याने आपली दुसरी गाडी त्याच जागी पार्क करायला सुरुवात केली. त्यानंतर ढोलकिया दाम्पत्याने सोसायटीकडे तक्रार केली आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
महाराष्ट्र राज्य सहकारी न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. कारण, कोर्टाने निकाल देताना सांगितले की, सोसायटीच्या आदर्श उपविधींनुसार पार्किंगची जागा ही फ्लॅट मालकाची खासगी मालमत्ता नाही. ती दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. पार्किंगच्या जागांचे वाटप करण्याचा अधिकार फक्त सोसायटीच्या व्यवस्थापन समितीकडे आहे.
कोर्टाने यावेळी उपविधी ७८(ब) चा हवाला दिला. पूर्वीच्या फ्लॅट मालकाला पार्किंगचे हक्क नवीन खरेदीदाराकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही. पण उपविधी ८२ नुसार, पार्किंग मिळवू इच्छिणाऱ्या नवीन फ्लॅट मालकाला सोसायटी अध्यक्षांकडे किंवा व्यवस्थापन समितीकडे स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल.
१५ वर्षांपासून कोणतीही हरकत न घेता तीच पार्किंगची जागा वापरत असल्याचा युक्तिवाद ढोलकिया दाम्पत्याने केला. यावेली न्यायालयाने सांगितले की, फक्त वर्षानुवर्षे पार्किंगची जागा वापरल्याने त्यावर कायदेशीर मालकी हक्क निर्माण होत नाही. दरम्यान, ढोलकिया दाम्पत्यांना अधिकृत पार्किंग वाटप मिळाले नसल्यामुळे ते त्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करू शकले नाहीत.
घर खरेदीदारांसाठी यातून काय धडा मिळाला?
नवीन अथवा जुना फ्लॅट खरेदी केल्यावर पार्किंग आपोआप आपल्यालाच मिळेल, असा ज्यांचा समज आहे, त्या सर्वांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे एखादा फ्लॅट खरेदी केल्यानंतर सोसायटीच्या नियमांनुसार पार्किंग वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. असे न केल्यास भविष्यात पार्किंगबाबत वाद निर्माण झाल्यास कायदेशीर दाद मिळवणे कठीण होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.