नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून दर महिन्याला काही पैसे पीएफ म्हणून कापले जातात. अनेकांना हा पैसा थेट बँकेत जमा होत असेल असं वाटतं. पण प्रत्यक्षात असं नाही. कर्मचारी आणि कंपनी दोघांचाही हिस्सा मिळून हा पैसा EPFO कडे जमा होतो. विशेष म्हणजे, EPFO हा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर्मचाऱ्यांना व्याज दिलं जातं. त्यामुळे तुमचा पीएफचा पैसा नेमका कुठे गुंतवला जातो आणि त्यावर व्याज कसं मिळतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
EPFO तुमचा पीएफचा पैसा एकाच ठिकाणी ठेवत नाही. या पैशाची सुरक्षितता राखून चांगला परतावा मिळावा, यासाठी वेगवेगळ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये सरकारी बॉन्ड आणि सरकारी रोख्यांचा मोठा वाटा असतो. याशिवाय कॉर्पोरेट बॉन्ड आणि इतर कर्जविषयक साधनांमध्येही पैसे गुंतवले जातात.
विशेष म्हणजे, पीएफच्या पैशाचा काही भाग शेअर बाजारातही गुंतवला जातो. पण EPFO थेट कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत नाही. त्याऐवजी ETF म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या माध्यमातून सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या निर्देशांकांमध्ये गुंतवणूक केली जाते.
EPFO स्वतःच्या मनाने गुंतवणुकीचे निर्णय घेत नाही. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि गुंतवणूक धोरणानुसार पैशांचे व्यवस्थापन केले जाते. यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजरही नियु्क्त केले जातात. PF वर किती व्याज द्यायचं, याचा निर्णय दरवर्षी घेतला जातो.
EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून (CBT) फंडाची कमाई आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर व्याजदराची शिफारस केंद्र सरकारकडे केली जाते. सरकारची मंजुरी आणि अधिकृत अधिसूचना आल्यानंतर व्याजदर लागू होतो. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी CBT ने PF ठेवींवर ८.२५ टक्के वार्षिक व्याजदराची शिफारस केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.