Team India's IPL Hero failure in WTC Final 2023 Ind Vs Aus Test Match Detailed analysis of the defeat  Saam TV
ब्लॉग

WTC Final Result Analysis: आयपीएलचे हिरो कसोटीत झिरो, टीम इंडियाचं कुठं चुकलं? पराभवाचं सविस्तर विश्लेषण...

Analysis Of WTC Final Result: आयपीएलमध्ये दिसणारे टीम इंडियाचे हिरो कसोटी सामन्यात मात्र झिरो ठरले, WTC फायनल सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, टीम इंडियाचं कुठं चुकलं? पराभवाचं सविस्तर विश्लेषण...

Satish Daud

WTC Final Result Analysis ICC: वर्ष २०१३, ठिकाण बर्मिंगहॅम पॅलेस इंग्लंड, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरात पराभूत करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटकाच्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १२४ धावांवर गारद झाला. २०११ ची विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करून टीम इंडियाने आपण खरचं चॅम्पियन्स असल्याचं जगाला दाखवून दिलं.

मात्र, त्यानंतर आता जवळपास १० वर्षांच्या कालावधी लोटला तरी सुद्धा टीम इंडियाला (Team India) आयसीसीच्या कुठल्याही फॉर्मेटमधील स्पर्धेत विजेतेपद पटकवता आलेलं नाही. २०१३ नंतर भारतीय संघाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह ९ वेळा आयसीसीच्या स्पर्धा खेळल्या आहेत. या सर्व ९ स्पर्धांमध्ये भारतीय संघ ४ वेळा फायनल आणि ४ वेळा सेमीफायनल खेळला आहे. तर एकदा २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनचच बाहेर पडला होता.

२०२१ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर पुन्हा टीम इंडिया २०२३ मधील WTC फायनलमध्ये पोहचली. त्यामुळे आतातरी टीम इंडिया आयसीसीच्या ट्रॉफी विजयाचा दुष्काळ संपवेल, अशी क्रिडाप्रेमींना आशा होती. पण घडलं भलतंच. भारतात टेस्ट मालिका खेळताना कमजोर दिसणाऱ्या कांगारुंनी WTC फायनलमध्ये विजय मिळवत टीम इंडियाची झोळी रिकामीच ठेवली. आयपीएलच्या (IPL 2023) कलर पिक्चरमध्ये दिसणारे टीम इंडियाचे हिरो पारंपरिक व्हाईट जर्सीमध्ये झिरो ठरले. ५ दिवसाचा खेळ पाहिल्यावर आपल्या खेळात तो कसोटी क्रिकेटचा फायटिंग कलरच दिसला नाही.

किंबहुना फायनलसाठी पुरेसा वेळही मिळाला नसल्याचंच अधोरेखित झालं. पराभवानंतर रोहित शर्मानेही (Rohit Sharma) ती बाब मान्य केली. पण खरंच टीम इंडियाच्या पराभवाला आयपीएल स्पर्धा जबाबदार आहे, असंही म्हणता येणार नाही. कारण आयपीएल स्पर्धा ही २००८ पासून सुरू झालेली आहे. याच कालावधीत टीम इंडियाने २०११ ची विश्वचषक स्पर्धा आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी सहज खिशात घातलेली आहे.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाने चूका करणे टाळल्या असता, तर आज कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. यातील पहिली चूक ठरली ती संघ निवडीची. रविचंद्रन आश्विनला संघाबाहेर ठेवून टीम इंडियाने स्वत:च्याच पायावर दगड पाडून घेतला. कारण, पाच दिवसांचा खेळ पाहिला तर रविंद्र जडेजा आणि नॅथन लायन या दोन फिरकीपटूंना भिंगरी टर्न मिळत होता. त्याचवेळी आपण चार वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरलो.

बरं संघ निवडीची बाजू सोडा. कसोटी सामन्यात (WTC Final 2023) नाणेफेक जिंकल्यानंतर अनेकदा कोणताही संघ प्रथम फलंदाजी करणे पसंत करतो. कारण, चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजांना खूपच मदत करते. अशावेळी २०० हून जास्त धावांचं टार्गेट मिळालं, तर ते आपल्याला झेपणार नाही, याचाच विचार संघांकडून केला जातो. टीम इंडियाने मात्र उलटचं केलं. टॉस जिंकल्यावर आपण पहिली बॉलिंग करणं पसंत केलं.

पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला (Australia) एकापाठोपाठ एक असे ठराविक अंतराने तीन धक्के दिले. पण ३ बाद ७२ अशा संकटात सापडलेल्या कांगारूंवर आपण दबाव कायम राखू शकलो नाही. चहापाण्यानंतर टीम इंडियाने आपल्या हातातून सामना घालवला. एका सेशनमध्ये ३४ ओव्हर्समध्ये १५७ धावांचा पाऊस कांगारुंनी पाडला. तर, आपल्या पदरी विकेटचा दुष्काळ आला. ट्रेव्हिस हेड वनडे क्रिकेटसारखी बॅटिंग करुन गेला. सोबत चिवट स्मिथ होताच.

जेव्हा तुम्ही प्रखम नाणेफेक जिंकता, समोरील टीमला ३ बाद ७२ अशा स्थितीत आणता, तेव्हा तुम्ही त्यांना ४६९ धावांचा आकडा गाठू देणं म्हणजे पराभवाच्या दरवाज्यात एक पाऊल ठेवल्यासारखंच आहे. त्यात गेल्या दोन-तीन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांची खराब कामगिरी बघितली तर हे आव्हान आपल्याला झेपणार नाही असंच वाटत होतं.

नुसतं खेळपट्टीवर घालवलेला वेळ आणि दोन्ही टीम्सनी खेळलेली षटकं याची आकडेवारी पाहिली तरी आपल्याला कळेल की, आपण का हरलो. म्हणजे पाहा ना, पहिल्या डावात वॉर्नर १०८ मिनिटं, लबूशेन १०३ मिनिटं, स्टीव्ह स्मिथ ३३ मिनिटं तर, हेड २८१ मिनिटं खेळपट्टीवर होते. याउलट टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे पाच फलंदाज पाहा - रोहित शर्मा २९ मिनिटं, शुभमन गिल ३३ मिनिटं, पुजारा ३५ मिनिटं आणि कोहली ५३ मिनिटंच मैदानावर घालवू शकले.

एकटा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) २५४ मिनिटं खेळपट्टीवर तग धरुन होता. तर शार्दूल ठाकूरनेही १५६ मिनिटं टिकाव धरलेला. पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरच्या जोडीने खेळपट्टीवर तग धरण्याची हिंमत दाखवली नसती, तर कदाचित टीम इंडिया एका डावानेच हरली असती. समोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला तुम्ही १७३ धावांची लीड त्यांना मिळू देता, तिथेच तुमच्या पराभवाची कथा तुम्ही लिहून जाता.

पहिल्या डावात रहाणे-ठाकूरची शानदार फलंदाजी आणि दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दाखवलेली काहीशी चमक यावरून या सामन्यात टीम इंडिया अनिर्णयीत करेल किंवा चमत्कार झाला तर विजयही मिळवले असं वाटत होतं. पण या सर्व आशेवर अखेर पाणी फेरलं. ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयपीएलमधील हिरो शुभमन गिल कसोटीत झिरो ठरला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा चांगली फलंदाजी करत होते.

रोहित मोठी खेळी करेल अशी अपेक्षा सुद्धा क्रिडाप्रेमींना होती. पण म्हणतात ना भरवशाची म्हैस हेला देते, तसंच घडलं. लायनला स्वीप मारण्याच्या नादात रोहितने विकेट फेकली. त्यापाठोपाठ चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) देखील कसोटीत टी-२० सामन्यातला फटका मारण्याच्या नादात बाद झाला. शेवटी काय तर अजिंक्य रहाणे हाच या निराशाजनक प्रवासातला आशेचा दिवा होता. त्याने संयम, जिद्द सारं काही दाखवलं. बोटावर उसळत्या चेंडूचे व्रण घेऊन तो लढला. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला, पण अकेला चना क्या भाड फोडेगा, अशीच गत झाली.

रहाणे बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि टीम इंडियाची झोळी पुन्हा रिकामीच राहिली. टीम इंडियाच्या या पराभवाला आयपीएल २०२३ स्पर्धा जबाबदार आहे, असं आज क्रिडाप्रेमी म्हणत आहेत. त्यांचा रोष बघता ते खरंही वाटत आहे. कारण, आयपीएल फायनल २९ मे ला झाली आणि कसोटी WTC फायनल ७ मे रोजी सुरु झाली. अवघ्या 9 दिवसांचा कालावधी मधल्या काळात होता. त्यात आपले पुजारा वगळता जवळपास सर्वच खेळाडू आयपीएल खेळत होते. तर, ऑस्ट्रेलियाचे ग्रीन आणि वॉर्नर वगळता अन्य एकही खेळाडू आयपीएलमध्ये नव्हता. ही बाबही पराभवाचं विश्लेषण करताना लक्षात घ्यावी लागेल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT