पुणे : MPSC च्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या सत्र काही थांबायचे नाव घेईना. आज अमर मोहिते (Amar Mohite) ह्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण रद्द झालं, पीएसआयची परीक्षा पास होऊनही केवळ एका मार्काने पीएसआय बनण्याची संधी हुकली आणि अमरने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली.
मनगटात काहीही करायची धमक असलेला युवावर्ग का खचतोय? याचं चिंतन सरकार, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी आणि न्यायमंडळ करणार आहे कि नाही? विद्यार्थ्याने आत्महत्या केली कि राज्यकर्त्यांकडून वेळेपुरती प्रतिक्रिया देऊन मागचे पाढे पंचावन्न अशीच स्थिती राज्यात होऊन बसली आहे.
अहोरात्र मेहनत करून, मिळेल ते खाऊन, असेल त्या परिस्थितीत विद्यार्थी उद्याच्या भविष्यासाठी कष्ट करतायत. मात्र, कधी परीक्षा रद्द, कधी परीक्षा पुढे ढकलणे, परीक्षा होऊनही नियुक्त्या रखडवणे, परीक्षा घेतल्याचं तर आधीच पैसे घेऊन परीक्षा सेटल होणे, पेपर फुटणे, वेळापत्रकात बदल होणे, यांसारखे गंभीर प्रकार या स्पर्धा परीक्षांमध्ये घडत आहेत. यावर नुसत्या सांगोपांग चर्चा करून भागणार नाही तर ठोस धोरणे आखण्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
स्वप्नील लोणकर, मल्हारी बारवकर, वैभव विष्णू विरकल, महेश लक्ष्मण झोरे अशी काही नावे आहेत ज्यांनी मागील १ ते दीड वर्षाच्या काळात नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. इतका अभ्यास करून, प्रचंड वेळ, मेहनत, पैसे खर्च करून जर MPSC करणारे विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
आत्महत्या (Suicide) झाली कि सर्वच स्तरातून क्षणिक प्रतिक्रिया उमटतात, दुःख व्यक्त केले जाते, चर्चा केल्या जातात मात्र हे थांबणार कधी याचे उत्तर कोणाकडे आहे? देशाचा कणा आणि भविष्य असलेला युवा वर्ग जर एवढा खचत असेल तर आता सर्वांनीच यावर विचार करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.