नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा व्यापारी बेमुदत बंद संपावर जाणार आहेत. केंद्राच्या निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याची दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांनी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला घातलेली बंदी तातडीने हटवण्याची मागणी केली. कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. त्यात सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजेंद्र गावित, खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली.
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्च्याचा रस्ता अडवला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांच्यासहित इतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज, शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विरोधी पक्षनेत्यांनी दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. विरोधकांनी सभात्याग केलेला असताना सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी थांबवून, विरोधक नाहीत ही संधी साधून काही वादग्रस्त विधेयके मंजूर करून घेतली, असा आरोप केला. या विधेयकांवर विरोधकांना चर्चा करायची होती. पण चर्चा न करता ही विधेयके मंजूर केल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली.
Maharashtra Political News: राज्यात दिवसाकाठी ४० नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील दोन तृतीयांश म्हणजेच तब्बल २५ हून अधिक बालके १ महिन्यांहून कमी वयाची असल्याचे ऑक्टोबर, २०२३ च्या सुमारास निदर्शनास आले होते.
या नवजात बालकांपैकी ६ जणांना श्वसनाचा त्रास होऊन मृत्यू झाला होता. बहुसंख्य शासकीय प्राथमिक अतिवदक्षता केंद्र (PICU) बालरोग आणि नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) येथील गर्दी, अपुरा कर्मचारी वर्ग आणि स्वच्छतेच्या कमतरतेचा त्रास महिलांना भोगावा लागत आहे. या ठिकाणी नवजात बालके अत्यंत असुरक्षित आहे. त्यांना दुर्दैवी मृत्युला सामोरे जावे लागत असल्याचे आढळून येते आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात महत्वाची चर्चा झाली. त्यांच्या बैठकीत अवकाळी पाऊस, मराठा आरक्षण याबाबत कधी चर्चा करायची यावर चर्चा झाली. त्यावर पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची इंदापुरात उद्या सभा होणार आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यातून ते ओबीसी बांधवांना संबोधित करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भुजबळ यांची पहिलीच सभा होणार असून या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, सभेआधी इंदापुरात छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सवर भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
नवाब मलिक यांच्यावर राजकारण तापलं आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक हे मनामध्ये तटस्थ भूमिका मनात ठेऊन जर सत्ताधारी बाकावर बसले असतील, तर तो त्यांचा विषय आहे. पण जे काही नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, ते खोटे आहेत, असे अजूनही आमचे मत आहे. राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यावर आरोप केले आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
नवाब मलिक यांना कदाचित काही अडचणी असाव्यात म्हणून, त्यांना अशा पद्धतीची भूमिका घेता येत नसावी. पण तो त्यांचा- त्यांचा विषय आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप खोटे आहेत असे मी ठामपणे सांगतोय, असेही रोहित पवार म्हणाले.
कर्नाटकचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या वादग्रस्त वक्तव्यविरोधात भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील वीर सावरकर उद्यानाबाहेर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
यावेळी खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर शाह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
विधानपरिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील आमदाराना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नोटीस पाठवली आहे. आमदारांनी ७ दिवसांच्या आत उत्तर द्यावं, असं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडण्यासाठी पर्यवेक्षकांची समिती जाहीर
राजस्थानमध्ये राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे पर्यवेक्षक
मध्यप्रदेशात मनोहरलाल खट्टर, के लक्ष्मण आणि आशा लखेडा पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार
लवकरच सर्व आमदारांची बैठक घेत मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक आजही अधिवेशात सत्ताधारी बाकावर बसले आहेत. नवाब मलिक काल ज्या जागेवर बसले होते, त्याच जागेवर आजही बसल्याचं दिसून आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहत नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असं म्हटलं होतं.
मला देवेंद्र फडणवीस यांचं पत्र मिळालं. त्या पत्रावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी घेईन, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली. विधानसभेत कुणी कुठल्या बाकावर बसायचं हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे, असंही अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर नवाब मलिकांची भूमिका काय? ते ऐकल्यानंतर मी याबाबत निर्णय घेणार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहलं.
नवाब मलिक यांच्यावर ज्यापद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असं फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं. त्यामुळे आज सभागृहात नवाब मलिक नेमकं कोणत्या बाकावर बसणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला देखील सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विरोधकांनी शिंदे गटासह भाजपला डिवचलं. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देखील लिहलं.
नवाब मलिक यांच्या पाठिंब्याची सरकारला गरज नाही, सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे, असं फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं. दरम्यान, पहिला दिवशी नवाब मलिकांच्या मुद्यावरून गाजवल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी विरोधक नेमका कोणता मुद्दा बाहेर काढणार, अधिवेशनात काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.