Bharat Jodo Yatra  saam tv
ब्लॉग

राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवतात, पण त्या ७ मिनिटांत मिळालं उत्तर

काँग्रेसमध्ये गोंधळ काही संपत नाही. राहुल गांधींसोबत महिला पत्रकार चालणार, नावं दिली पण, त्यांची व्यवस्था काय, कुठे उभे राहायचे, पासेस कुठे? याचा कुणाला पत्ता नाही...

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

भारत जोडो यात्रा कव्हर करायला गेल्यावर राहुल गांधी यांना भेटणे, त्यांच्याशी बोलायला मिळावं ही साधी अपेक्षा होती. जयराम रमेश यांना तशी विनंती केली होती आणि अचानक १६ नोव्हेंबर, ज्या दिवशी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी विचारलं. राहुल गांधींबरोबर चालायला येशील का? हो म्हटले. त्यांनी सांगितलं १९ तारखेला शक्ती दिवस आहे. त्या दिवशी ये. महिला पत्रकार तुम्ही चाला, गप्पा मारा त्यांच्याशी...

१९ तारीख आली..इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त यात्रेत त्या दिवशी फक्त महिला चालणार होत्या...सकाळी साडेपाच वाजल्यापासून महिलांची गर्दी, गडबड...

काँग्रेसमध्ये गोंधळ काही संपत नाही..राहुल गांधी यांच्याबरोबर महिला पत्रकार चालणार, नावं दिली पण, त्यांची व्यवस्था काय, कुठे उभे राहायचे, पासेस कुठे याचा कुणाला पत्ता नाही...

पहाटे राहुल गांधी यांनी ५.४५ वाजता चालायला सुरूवात केली...पोलीस, SPG, त्यात महिलांची गर्दी- धक्काबुक्की.. मी आणि पत्रकार मैत्रीण प्रियदर्शिनी एकमेकांचा हात धरून चालतोय.. एवढा लोंढा आला की आम्ही पळायला लागलो, त्यात रस्ता छोटा.. रस्त्याच्या बाजूला पण काटेरी झुडपं..म्हणजे बाजूला गेलो तर तिथे लागणार.. 

दोन-तीन किमी अशीच धावपळ करत शेवटी आम्ही वैतागून मीडिया गाडीत गेलो. वाटलं राहुल गांधींची भेट काही होत नाही, निघावं मुंबईला परत...असेच बसलो असताना राष्ट्रीय महिला अध्यक्ष नेत्ता डिसुझा दिसल्या..त्यांच्या पायाला लागलं होतं..त्यांना गर्दीतून मीडिया गाडीत घेतलं. थोडा वेळ बसल्यावर त्यांनी विचारलं, तुम्ही पत्रकार चालल्या की नाही? भेटलात की नाही?

आम्ही नाही म्हटले.. इतक्या गर्दीत धक्काबुक्की झाली..पोलीस काही चालू देईनात ...त्या म्हणाल्या आपण काहीतरी करू.

थोड्या वेळाने यात्रा एक गावात पोहचली. तेव्हा नेत्या म्हणाल्या, चला जाऊया, प्रयत्न करुया...

परत आम्ही धावत चालत निघालो.. आसपास गच्चीत थांबून घराबाहेर येऊन अनेक महिला यात्रेचे स्वागत करत होत्या. नुसती गर्दी...आणि त्या गावच्या छोट्या रस्त्यात पण राहुल गांधी प्रत्येकाला भेटत होते, बोलत होते.

आम्ही पुन्हा एक- दीड किमी चालत शेवटी राहुल गांधींपर्यंत पोहोचलो.. पण SPG security चा दिल्लीपासून अनुभव असल्यामुळे भीती वाटत होती.. शेवटी महिला काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं. महिला पत्रकार आहेत, जाऊ द्या.. मग आम्हाला राहुल गांधी यांच्याबरोबर चालण्याची संधी मिळाली..

राहुल गांधी यांना भेटून ओळख करून दिली, माझं नाव, संस्थेचे नाव..

पत्रकार असेल तरी ही मुलाखत नाही, असं राहुल गांधींनी स्वतः सांगितलं..म्हटलं, हो सर..

मग सुरुवात झाली संवादाची... कैलास मानसरोवर यात्रा या विषयावरून..राहुल गांधी यांनी विचारलं... तू पूर्ण चालली की घोड्यावरून गेलीस.. मी म्हटले, चालले... मी फक्त मधल्या कठीण भागात घोडा वापरला. मग हसले. म्हणाले, मग तू यात्रा केली नाही, घोड्याने केली.. पुढच्या वेळी तू चालत जा...मग त्यांनी विचारले यात्रेच्या सुरुवातीला एक पॉइंट आहे, माहीत आहे का? पॉइंट माहीत होता, पण नाव विसरले होते.. त्यांना सांगितलं ते एक द्वार आहे, जिथून गेलं की तुम्हाला मोक्ष मिळेल, असं मानतात; मग राहुल गांधी म्हणाले, त्याला यमद्वार म्हणतात..

का म्हणतात माहीत आहे?.. तिथून आपली इच्छा, अहंकार, greed मागे टाकले पाहिजे. यात्रेचा हेतू तो आहे.. मी म्हटले detachment शिकावी हेच ना? राहुल गांधी म्हणाले, तो एक शब्द आहे ..पण मूळ गोष्ट आपल्यात जे काही आहे, हव्यास आहे, हे हवं... ते हवं... अहंकार आहे. मनात तो तुम्ही सोडणे.. गोष्टी आहे तशा स्वीकारणे, हे त्यातील moral आहे...

Bharat Jodo Yatra

मग अचानक एक मुलगी धावत आली. आमचे बोलणे थांबले.. लिंक तुटली...ती मुलगी गेल्यावर त्यांना विचारलं. तुम्ही meditation करता का? म्हणाले, हो...यात्रेत चालतो हे पण meditation आहे...

मी त्यांना महाराष्ट्रातील अनुभवांविषयी विचारलं. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र आवडला.. इथे जो प्रतिसाद मिळाला..लोक आजही विचारधारा मानतात, त्यासाठी आले, इतरांना खुल्या मनाने स्वीकारतात हे आवडले. उत्स्फूर्तपणे लोक भेटले, बोलले हेही त्यांनी सांगितलं..

ही चर्चा सुरू असताना मागून राहुल गांधी यांची टीम त्यांना सांगत होती. आता दुसऱ्यांचा नंबर आहे ..मला निरोप देण्याची वेळ आली आहे.. मी निघणार तितक्यात त्यांनी विचारलं, घरी मुलं आहेत का? कसा वेळ काढला?.. तेव्हा त्यांना म्हटले, मी एकटी आहे, मुलं नाही, जबाबदारी नाही, त्यामुळे काम करू शकते. मनासारखं... मग त्यांनी विचारलं. समाजात, आसपासच्या सर्कलमध्ये अविवाहित असण्याचा त्रास होतो का? कोणी बोलतं का? मी सांगितलं, आईवडील आहेत, त्यांनी स्वातंत्र्य दिले, वैयक्तिक आयुष्य आणि करियर करण्याचं, ते पाठीशी उभे आहेत. त्यामुळे विशेष त्रास होत नाही.. आमच्यात इतकं स्वातंत्र्य मुलींना आहे..

मग त्यांनी आईवडील काय करतात?, कुटुंबाची चौकशी केली. त्यांना सांगितलं, आई बँकेत होती. वडील BMC मध्ये होते. बहीण अमेरिकेत नोकरी करते.. ते सगळे नेहमी सपोर्ट करतात..त्यांनी मला financially, emotionally support केला म्हणून, मी पत्रकारिता या क्षेत्रात करियर करू शकले.. मग त्यांनी विचारलं पत्रकारिता का निवडली ? ..मी सांगितलं, बहीण इंजिनीअर आहे. मला काहीतरी वेगळे करायचं होतं.. लिहायला आवडत होतं. आपण काहीतरी समाजासाठी करावं या हेतूने पत्रकारितेत आले...

त्यावर ते म्हणाले, मी अनेक तरुणांशी बोलतो, त्यांना डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे.. तुम्ही वेगळं क्षेत्र निवडले.. महाराष्ट्रामध्ये अजून तसे मोकळे वातावरण आहे.. पत्रकार आपली भूमिका मांडत आहेत. इतर ठिकाणापेक्षा हे आश्वासक आहे, असं मत त्यांनी मांडले.. 

त्यांच्यावर होणारी टीका, trolling हा विषय निघाला.. तेव्हा राहुल गांधी म्हणाले, जे तुमच्यावर टीका करतात, वाईट शब्दात बोलतात.. They are not grounded. They can only offer hate, nothing else.. त्यांच्या मनात द्वेष आणि राग आहे. त्यामुळे तुम्हाला ते तेवढंच देऊ शकतात.. पण हा द्वेष, राग ,भीती जास्त काळ टिकू शकत नाही.. एक दिवस तेही संपणार... त्यामुळे कोणालाही न घाबरणे, आपले काम करत राहणे हेच करायचं.. आम्ही सात मिनिटं बोलत होतो.. त्यात ते म्हणाले, मला फक्त राहुल म्हण, सर म्हणू नकोस...

शेवटी मागून खूप वेळा आता दुसरे पत्रकार येऊ दे, असे संकेत आल्याने चर्चा थांबवली..आणि हँडशेक करत निरोप घेतला...

राहुल गांधी यांना भेटल्यावर जाणवलं की, जे चित्र उभं केलं होतं, त्यात आणि खरा राहुल गांधी यात तफावत आहे..राहुल गांधी गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत, धरसोड वृत्ती आहे...किंवा ते पप्पू आहेत, त्यांना भेटून-बोलून किंवा यात्रेत चालताना बघून असं कुठेच वाटलं नाही.

महत्वाचे म्हणजे ज्या माणसावर इतकी टीका झाली.. तो मूर्ख आहे..त्याचे पणजोबा ते आई यांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवले..आणि ही चर्चा कुठे बंद खोलीत नाही, तर संपूर्ण देशात झाली, कुटुंबाची मानहानी झाली तो माणूस किती संतप्त असेल.. मनात किती राग असेल त्याच्या.. एका क्षणी तो निराश होऊन सगळं सोडून निघून जाईल, खूप कडवट होईल..पण राहुल गांधी कुठेच नकारात्मक दिसले नाहीत..त्यांच्यावर होणारी टीका असो किंवा त्यांची भूमिका नीट कुठे दाखवत नसली तरी...

ते आपलं काम करत आहेत.. लोकांच्या वेदना, समस्या जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी तयार आहेत.. त्या माणसात प्रचंड सहनशक्ती आहे, जे येईल ते स्वीकारण्याची..आणि त्यांची स्वतःची philosophy आहे.. त्यामुळे ते नकारात्मक गोष्टी मनाला लावून घेत नाही हे जाणवलं!

राहुल गांधी हा माणूस जे करतो, ते conviction ने करतो...तो तेच करतो, जे त्याला पटतं..त्याची प्रत्येक कृती राजकीय फायदा किंवा तोटा पाहून नाही...म्हणजे राजकारणात असून पण politically incorrect वागणारा नेता राहुल आहे.. ज्याची वैचारिक बैठक आहे.. त्याला खोटेपणाने वागता येत नाही. उगीच बडेजाव नाही. मला खूप समजतं, मीच सगळं करीन, मीच देशात बदल घडवून आणणे असा कोणताही आव ते आणत नाहीत.

राहुल गांधी यांच्या शेगाव सभेतील एक वाक्य खूप आवडलं, जे कायम लक्षात राहील आणि तीच त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी वाटते..

bharat jodo yatra

ज्या माणसाने हिंसा सहन केली आहे, त्याच्या जखमा भोगल्या आहेत, त्यांच्या मनात कसलीही भीती नसते..आणि तो कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही, दुसऱ्याला जखमा देणार नाही कारण त्याने तो त्रास भोगला आहे..

राहुल गांधी genuine राजकारणी आहे.. पण आपल्या देशातील राजकारण इतकं प्रगल्भ आहे का? की इतक्या प्रामाणिक, politically incorrect व्यक्तीला ते स्वीकारतील? हा प्रश्न यात्रेच्या अखेरीस मला पडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT