बीड - गावखेड्यात पाणी पुरवठा योजनेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला. मात्र आजही गावात पैसा खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही भीषण परिस्थिती बीड (Beed) जिल्ह्यातील सिमरी पारगाव गावातील आहे. याच गावात भारत निर्माण राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत योजना गावात राबविण्यात आलीय. मात्र शासकीय योजनाचे पाणी येत नसल्यामुळे, या गावात चक्क सरपंच आणि माजी सरपंच स्वतःहाच्या खाजगी पाईपलाईन द्वारे पाणी विकत देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या सिमरी पारगाव या गावात पाणी पुरवठा योजनेसाठी भारत निर्माण राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 56 लाख रुपये निधी आला. मात्र गावातील माजी सरपंचानी स्वतः गुत्तेदारी करत निधी देखील कागदोपत्री खर्च केला. मात्र खाजगी, 2 पाईप लाईन मधून गावातील आजी माजी सरपंचाचा पाणी विक्रीचा गोरख धंदामात्र जोरात सुरु आहे. गावातली नागरिकांना पाणी विकून पाण्यासारखा पैसा कमवला जात आहे.. माञ गोर गरीब लोकांना पाण्यासाठी पाय पीट करावी लागतेय. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हे भेसूर आणि भीषण वास्तव झंनझनित अंजन घालणारे आहे..
तर गावातील महिला म्हणाल्या, की पाण्यासाठी इकडे तिकडे वणवण भटकंती करावी लागते.. पाणी कोणी देत नाहीत, पाण्यासाठी भांडण खेळावे लागत आहेत.. 3 हजार रुपये मोजून देऊनही पाणी वेळेवर मिळत नाही. त्यांच्याशी भांडण करावं लागत, गावात मोठी योजना झाली पाणी येईल असं वाटलं होतं, मात्र पाणी आलेच नाही. त्यामुळं पैसे देऊन पाणी घ्यावं लागतंय, जर आम्ही पैसे नाही दिले तर पाणी सोडत नाहीत.
या गावातील दुसऱ्या महिला म्हणाल्या, की सकाळी लवकर उठून पाण्याच्या शोधासाठी गावात इकडे तिकडे फिरावं लागतं. दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे घरातली काम आणि पाणी यामुळे जीव वैतागून जातोय. पाण्याची टाकी केली, मात्र तिचा काय उपयोग नाही, नळाला पाणी येत नाही. 3 हजार रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते, ते पण भरपूर पाणी देत नाहीत, पाण्याची लय मोठी अडचण आहे ती दूर करावी. अशी मागणी सुरेखा पडूळे या महिलेनी केलीय.
हे देखील पाहा -
आम्ही मजूर आहोत. ऊस तोडणीसाठी कारखान्याला जाऊन उदरनिर्वाह भागवतो. 3 हजार रुपये आणायचे कुठून ? पैसे नाही दिले तर पाणी सोडत नाहीत. गावातील हातपंपाचे पाणी दूषित आहे, ते पिता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांच्या विहिरवर जाऊन पाणी आणावे लागते. असं गावातील नागरिकांनी सांगितलं. पाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे, पाणी विकत आणावे लागते तेही आठ दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे हे पाणी इतर ठिकाणी शोधून पाणी आणावे लागत आहे. असे गावातील महिला सांगतात.
सिमरी पारगाव गावातील रत्नमाला मुकुंद कांबळे, या मोलमजुरी करून आपला घर चालवतात. त्यांच्या घरामध्ये 10 माणसे आहेत. पाण्यासाठी हंडा घेऊन डोक्यावरती पाणी आणून पाण्याची टाकी भरली जाते. आणि तेच वापरले जाते. त्यांना विचारले असता आम्ही गरीब आहोत, 3 हजार रुपये कुठून आणणार ? पैसे नाही दिले तर पाणी मिळत नाही, गावात योजना आहे मात्र पाणी चालू नाही. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी रत्नमाला यांनी केली आहे.
याच गावातील वयोवृद्ध अंध आणि अपंग यांच्या वाट्याला चहा पाण्यासाठी मोठा संघर्ष आला आहे. पंचफुला सोळंके या अंध आहेत, पाणी आणण्यासाठी स्वतः पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. गावात शासकीय योजना झाली, मात्र त्याचं पाणी आलं नाही. गावातील जी खाजगी नळ आहे ते दारात आहेत. मात्र त्यांना 3 हजार रुपये द्यायचे कुठून ? तेही वेळेवर मिळत नाही, असं पंचफुला यांनी सांगितलं.
घरामध्ये आम्ही दोघंच असतो माझ्या मालकाला चालता येत नाही, तर मला दिसत नाही. मात्र पाण्यासाठी मला जावं लागतं, कोण पाणी आणून देणार ?विकत पाणी घेण्यासाठी पैसे देऊनही वेळेवर पाणी मिळत नाही, तीन तीन महिने पाणी येत नाही, आणि ग्रामपंचायत थेंब सुद्धा येत नाही. गावामध्ये योजना झाली, विहीर पाडली मात्र पाण्याचा थेंब आला नाही. असं पंचफुला यांचे अपंग वयोवृद्ध पती कर्णराव यांनी सांगितले.
गावात सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. गावात सरपंच पाणी विकत आहेत, माजी सरपंच देखील पाणी विकत आहेत. 3 हजार रुपये प्रति वर्षाला द्यावे लागतात. दोन दिवसाला पाणी सोडू असं सांगितलं जातं. मात्र पंधरा दिवसाला महिन्याला पाणी सोडतात. त्यामुळे पाण्याचे खूप वाईट परिस्थिती आहे. पाणी तात्काळ उपलब्ध करून द्याव. असं केशव घायतडक यांनी सांगितलं
गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 56 लाख रुपये आले होते. मात्र ते 56 वाटाणे गेले. गावात टाकी बांधूनही पाण्याचा थेंबही अजून आला नाही.आज विकत पाणी घ्यावे लागते. तीन हजार रुपये वर्षाला द्यावे लागतात. टाकी बांधून सात ते आठ वर्ष झाले, मात्र टाकीतच पाणी आले नाही. तर नळाला पाणी कुठून येणार ? असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
गावात दोन विहिरीमधून पाणी येत, मात्र या दोन्ही विहिरीच्या पाईपलाईन खासगी आहेत.. यात विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच हे विकत पाणी देतात.. तेही वेळेवर मिळत नाही..गावातील योजना मात्र तशीच पडून आहेत..
गावातील पाणी पुरवठा योजने संदर्भात गावचे सरपंच यांना विचारलं असता, गावात पाणी पुरवठा योजना झाली, मात्र ती अपूर्ण आहे.. अजून ग्राम पंचायतकडे हस्तानतरीत केली नाही. माझ्या अगोदरच्या सरपंचाने ती केली होती. मात्र पाणी आलं नाही.या संदर्भात आम्ही पाठपुरवठा केला..गावातील पाणी विक्री संदर्भात 2400,रुपये वर्षाचा खर्च घेऊन आम्ही पाणी देतो.. अस सरपंचांनी कबूल केलं. तसेच माजी सरपंच हे अर्ध्या गावाला पाणी विकत देतात, तर माझ्याकडे 20/25 कुटुंब आहेत असे सरपंच यांनी सांगितले.
सिमरी पारगाव गावची माहिती माझ्या पर्यंत आलीय. या संदर्भात पाणी विकणारे सरपंच आणि गावातील पाणी योजने संदर्भात नोटीस काढतोय. योजने संदर्भातील माहिती घेत आहे..यात काही आढळून आले तर दोषींवर कारवाई केली जाईल. अस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान पाणी योजनासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही, पाणी गावात येत नसेल तर या योजनेचे पाणी मुरले कुठे ? त्यातच आजी-माजी सरपंचांचा पाणी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. या बाबतीत जिल्हयाचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष देऊन गावचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.