बातम्या

महाविुकास आघाडीचे तीन चाकांचे सरकार टिकणार नाही - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मंगळवारी नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 80 तासांपूर्वीच स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकारला आज पायउतार व्हावे लागले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने भाजपकडे बहुमत नव्हते. परिणामी, विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे न जाता देवेंद्र फडणवीस यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करत महाविकास आघाडीचे तीन चाकांचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर विरोधी आघाडीच्या गोटात जल्लोष सुरू झाला. फडणवीस यांनी दुपारी चारच्या सुमाराला राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपविला. 

राज्यपालांना राजीनामा सोपवण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे आमच्याकडेदेखील बहुमत उरलेले नाही. कोणाचेही आमदार फोडायचे नाहीत, घोडेबाजार करायचा नाही ही भाजपची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती, त्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेनंतर राज्यपालांना भेटून आम्ही सरकारचा राजीनामा सादर करणार आहोत.'' राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृहावर पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. सह्याद्री राज्य अतिथिगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, ""निकालानंतर पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेने बार्गेनिंग सुरू केले. सेना नेते आमचे सगळे पर्याय खुले आहेत, असे सांगत होते. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायचे, असे कधीच ठरलेले नव्हते. तुम्ही मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो, असे शिवसेना नेते वारंवार सांगत होते. त्यावर भाजपने तात्त्विक भूमिका मांडली. निवडणुकीआधी जे ठरले आहे ते देऊ, जे ठरले नाही ते देणार नाही, अशी आमची भूमिका होती. दरम्यानच्या काळात शिवसेना आमच्याशी चर्चा करण्याऐवजी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत बोलत होते. आमच्याशी मात्र बोलत नव्हते. त्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांनी पहिल्यांदा आम्हाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावले. आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेस नकार दिला. त्यानंतर शिवसेनेला बोलावण्यात आले. मात्र, त्यांचेही हसे झाले. मग राष्ट्रवादीला बोलावले. मात्र, राज्यात कोणीच सत्ता स्थापन करू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरही शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये दहा-बारा दिवस सातत्याने चर्चा सुरू होत्या; पण सरकार काही होत नव्हते. याचे कारण हे तिन्ही पक्ष पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध होते. हे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यांच्या सत्तास्थापनेचा किमान समान कार्यक्रम हा एकमेव म्हणजेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवा इतकाच होता.'' 

""राज्यात किती काळ राष्ट्रपती राजवट चालेल, या प्रश्‍नाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही राज्यात सरकार स्थापन केले. आज ज्या वेळी न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर अजित पवार यांनी मला सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा देत आहे. त्यांचा राजीनामा आल्यामुळे आमच्याजवळदेखील बहुमत उरलेले नाही. भाजपची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच होती. आम्ही कोणाचेही आमदार फोडणार नाही. त्यामुळे आता आम्हीदेखील हा निर्णय घेतला. कोणताही घोडेबाजार न करता आम्हीदेखील राजीनाम्याचा निर्णय घेतला,'' असे फडणवीस म्हणाले. 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नव्या सरकारला शुभेच्छा देताना हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल, असे ते म्हणाले. शिवसेना नेते सोमवारी सोनियांची शपथ घेत होते. सत्तेकरिता किती मोठी लाचारी करता, असा सवालही त्यांनी केला. त्यांना ही लाचारी लखलाभ होवो, दोन चाके असलेले सरकार धावते, तीन चाकांचा ऑटोरिक्षादेखील धावतो; पण त्याची काय अवस्था होते, हे सर्वांनाच माहिती आहे, असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला आहे.


Web Title: Devendra Fadnavis criticizes maharashtra new government
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT