अमरावती: विदर्भातील अमरावती जिल्ह्यात अनेक संत्रा उत्पादक दरवर्षी मृग आणि आंबिया बहार संत्रा पिकाचे उत्पादन घेतात. मात्र संत्री पिकवणारा हा शेतकरी सलग चौथ्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांना लागलेली गळती. सध्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून संत्राला दरही अपेक्षित दरही मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. (Thousands of hectares of orange orchards in Amravati are in crisis due to non-receipt of expected rates)
हे देखील पहा -
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, अचलपूर, परतवाडा या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. जिल्ह्यातील हे तालुके चांगल्या उत्पादनक्षम मालाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडत आहे. तर गेल्या काही दिवस आधी पडलेल्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे सध्या संत्रा पिकाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.
सुरवातीला हजारो संत्रा झाडांवर होत्या, मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्री शिल्लक आहेत. त्यात शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने कुठलेच वाहन संत्रा बागापर्यंत जात नाही, त्यामुळे व्यापारीही शेताकडे फिरकत नाही. मग संत्रा कोण खरेदी करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संत्रा पिकाला लागलेली गळती पाहण्याकरिता कृषी विभागाकडून अद्यापपर्यंत तरी कोणीच अधिकारी या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेला नाही. तर नागपूर येथे जे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे, त्या संशोधन केंद्राचा सुद्धा काहीही उपयोग या शेतकऱ्यांना होत नाही.
संत्राची गळती थांबवण्याकरता शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची फवारणी झाडांवर केलेली आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तर व्यापारी ही या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करतांना दिसून येत आहे. सुरुवातीला चारशे ते पाचशे रु. २० किलोचे क्रेट मागितले जायचे, त्या क्रेटचा दर आता दीडशे ते दोनशे रुपयांवर आला आहे. त्यामुळे बँकेमधून घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
एकेकाळी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील संत्रा उत्पादकांची आजची स्थिती फारच वाईट आणि दयनीय झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग,नागपूर येथील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ या गळतीवर काही तोडगा काढतील का? याकडे आता सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.