परभणी : वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन तोडले जात आहे तर कोठे डीपीच बंद केली जात आहे. सेलू तालुक्यातील देवगाव 33 केव्ही केंद्रावरील कृषीचे फिडर बंद केलं आहे. यामुळे ऐन भिजवणीच्या काळात सहा गावातील जवळ पास एक हजार कृषी पंप पाणी असून बंद पडली आहेत. शेतकऱ्याच्या विहिरी तुडुंब भरल्या आहेत बोरला मुबलक प्रमाणात पाणी आहे. महावितरणच्या वीजतोडणी कारवाईमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
सध्या घरगुती, औद्योगिक आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात मोठी थकबाकी आहे. एकीकडे सक्ती करणार नाही असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. परभणी जिल्ह्यात ही मोठी थकबाकी आहे, त्यामुळे महावितरणने ऐन रब्बी पिकांना विहरीत, बोरला मुबलक पाणी असताना वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली आहे. सेलू तालुक्यातील देगाव 33 केव्ही केंद्रावरील कृषी फिडर काल पासून बंद करण्यात आला आहे.
देवगाव फाटा 33 केव्ही सर्कल, नांदगाव, बोरकिनी, नरसापूर, गिरगाव बुद्रुक आणि गिरगाव खुर्द चिकलथाना फिडर वरची मोरेगाव, जवळा, रायपूर अशी अनेक क्रुषी पंपांची वीज जोडणी बंद केली आहे. यामुळे हरभरा, हळद, ज्वारी, ऊस ह्या पिकांना फटका बसत आहे. 5 एचपीच्या मोटार कनेक्शनला 14 हजार रुपये भरा अशी सक्ती महावितरणच्या वतीने केल्या जात असल्याचं बोरकीनी येथील शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
फिडर बंद करण्याचे प्रकार सुरू असल्याने शेतीतील पीक वाळून जात आहेत. फिडरच बंद केले गेल्याने ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे, त्यांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल आहेत, त्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विमा मिळाला. त्यामुळे सदर रक्कम भरायची कशी असा सवाल नरसापुर येथील शेतकरी विचारत आहेत.
घरगुती वीज धारकांना प्रती महिन्याला तर कृषी पंप धारकांनी तीन महिन्यांना बिल भरणे आवश्यक आहे. पण तसं होत नाही, थकीत बिलाची वाढती संख्या पाहता महावितरणने डीपी बंद करण्याचे काम हाती घेतले आहे. देगाव येथील फिडर बंद केला की याबाबत माहिती नाही, पण वीज धारकांनी वीज बिल भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे ही वीज कनेक्शन कट केले जाईल अशी माहिती विद्युत महामंडळाचे परभणीचे वरिष्ठ अभियंता अन्नछत्रे यांनी सांगितले, पण कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे ऐन भिजवणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर आता सुलतांनी संकट उभे ठाकले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.