भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीकाटिपणी सुरु आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसल्यास त्या महिलांचे फोटो काढा, त्यांची नावे लिहून घ्या, आम्ही त्यांचा व्यवस्था करू असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी रात्री एका सभेत केले. मात्र आपल्या या विधानाचा काँग्रेस नेत्यांनी विपर्यास केला असून आपण केवळ वोट जिहाद होऊ नये यासाठी हे वक्तव्य केल्याचा खुलासा खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केलेला आहे.
त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असतानाच, या योजनेवरुन महायुतींच्या नेत्यांमध्ये अहंकार पसरल्याचे दिसून येत आहे. पुढे धनंजय महाडिक म्हणाले की, जर कोणती महिला मोठ्याने बोलू लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि तिला यावर सही कर असे म्हणायचे. आम्ही लगेच पैसे बंद करतो असे वक्तव्यही त्यांनी केले.
दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या या विधानावर कोल्हापुरात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, येथे महिलांचा सन्मान केला जातो, मात्र धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला आहे त्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली आहे. धनंजय महाडिक यांची पार्श्वभूमी ही महिलांचा अपमान करणारी पार्श्वभूमी आहे. मागच्या पोटनिवडणुकीत सुद्धा आमदार जयश्री जाधव यांचा अपमान केला. आता तर त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन गुंडगिरीची भाषा करतात महाडिक त्याच्यासाठी फेमस आहेत.व्यवस्था करतो अशी धमकी त्यांनी महिलांना दिलेली आहे असे सतेज पाटील म्हणाले.
महिलांच्या योजना या भाजप प्रणित महिलांसाठी होत्या, का महाराष्ट्रातल्या महिलांसाठी होत्या? हा प्रश्न निर्माण होत आहे .काँग्रेसच्या रॅलीत येणाऱ्या महिलांची नावे लिहा, फोटो काढा हा तुम्हाला अधिकार कोणी दिला? या महाराष्ट्रात लोकशाही आहे ही धमकी आहे याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत देणार.त्यांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध करतो असे काँग्रेस विधिमंडळ गटनेते सतेज पाटील यांनी सांगितले.
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्पष्टीकरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पॉप्युलर असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ती गेम चेंजर ठरणार आहे. राज्यात २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ झाला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात साडे १० लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये अशाच पद्धतीच्या घोषणा केल्या होत्या, मात्र त्या योजना सुरू नाहीत. काँग्रेसचे लोक फेक नेरेटिव्ह सेट करत आहेत. काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांचे फोटो काढा त्यांचा बंदोबस्त करू या माझ्या वाक्याचाही विपर्यास केला गेला आहे. ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांना याचा लाभ मिळवून देण्याची व्यवस्था करू हे सांगण्याची माझी यामागची भूमिका होती. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्याचं काम हे काँग्रेसच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना सुरुवातीला अनेक नेत्यांनी या योजनेला विरोध केला. मात्र ही योजना पॉप्युलर झाल्यानंतर आता १५०० ऐवजी ३००० देऊ असं म्हणतात. आता त्यांच्या तिजोरी मध्ये खडखडाट होत नाही का? आता ते ३००० रुपयांचा बंदोबस्त कसा करणार आहेत? आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही का? हा प्रश्न महा विकास आघाडीच्या नेत्यांना विचारला पाहिजे असा वक्तव्य केल्याचा खुलासा खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केलेला आहे.
Written By: Dhanshri Shintre.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.