स्मिताचं स्मित हास्य ते तिची शेवटची इच्छा...

स्मिताचं स्मित हास्य ते तिची शेवटची इच्छा...

अभिनेत्री स्मिता पाटील यांची 62वी जयंती आहे.. त्यांनी सिनेसृष्टीत गाजवलेली कारकीर्द अजरामर ठरली आहे.. त्यांचे सिनेमे आजही आवडीने बघितले जातात.. त्याचनिमित्त प्रेरणा जंगम यांनी यांच्याकडून स्मिता यांना आदरांजली वाहण्यासाठी हा विशेष लेख..

कारकीर्द अजरामर करुन ठेवलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती.  17 ऑक्टोबर 1955 मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला. जेव्हा त्यांच्या चित्रपटांविषयी त्यातील भूमिकांविषयी बोललं जाते तेव्हा नैसर्गिक आणि संवेदनशिल अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख समोर येते. स्मिता पाटिल यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

कसं पडलं स्मिता हे नाव ?
स्मिता पाटिल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यांची आई विद्या ताई पाटिल यांनी त्यांचं नाव स्मिता असं ठेवलं. आणि हेच हास्य पुढे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सगळ्यात आकर्षक गोष्टही ठरली.

सिनेमांमध्ये येण्याआधी होत्या वृतनिवेदिका
सिनेमांमध्ये येण्याआधी स्मिता पाटिल दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिकेचं काम करत होत्या. बातम्या वाचताना त्यांना साडी नेसणं गरजेचं असायचं. स्मिता यांना जीन्स परिधान करायला आवडत असे आणि म्हणूनच बातम्या वाचण्याच्या आधी त्या जीन्सवरचं साडी नेसायच्या.
 
गाडी चालवण्याची आवड
स्मिता पाटिल यांचं जीवनचरित्र लिहीणाऱ्या मैथिली राव सांगतात की, "स्मिता पाटिल यांना गाडी चालवण्याची प्रचंड आवड होती. हेच कारण आहे कि त्या अवघ्या 14-15 वर्षांच्या असताना त्यांनी लपून छपून ड्राइविंग शिकून घेतली होती."

हिट सिनेमे
1974मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या अभिनयात सच्चेपणा होता.  श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'भूमिका', 'मंथन', 'आक्रोश', 'मिर्च मसाला', 'अर्थ', 'मंडी', 'निशांत' सारखे कलात्मक चित्रपट आणि 'नमक हलाल', 'शक्ति' सारख्या व्यावसायिक चित्रपटांमधून त्यांनी वेगळी छाप निर्माण केली. 'भूमिका' आणि 'चक्र' सिनेमासाठी त्यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला होता. तर 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' या मराठी सिनेमांमुळेही त्यांचं कौतुक झालं.  
 
कडक उन्हातही केलं शूट
'मिर्च मसाला'चे दिग्दर्शक केतन मेहता सांगतात की, " 'मिर्च मसाला'च्या चित्रीकरणाच्या एका सिन दरम्यान एका मिर्चीच्या कारखान्यात उन्हाळ्याच्या दिवसांत चित्रीकरण करायचं होतं, कडक ऊन आणि गर्मी असतानाही स्मिताने मोठ्या स्पिरिटने  चित्रीकरण केलं आणि इतर यूनिटलाही प्रोत्साहित केलं होतं."
 
स्मिता पाटिल यांचं स्वप्न आणि बिग बी
बिग बींच्या कुली चित्रपटाच्या शुटिंगच्या आदल्या दिवशी स्मिता यांचा बिग बींना प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी फोन आला होता. स्मिता यांना बिग बींविषयी पडलेलं वाईट स्वप्न याचं कारण होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 'कुली'च्या सेटवर बिग बींना अपघात झाला होता. हा अंगावर काटा आणणारा किस्सा बिग बींनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलून दाखवला होता.

प्रेम आणि लग्न
स्मिता पाटिल यांचं अभिनय, चित्रपट जितके चर्चेत राहिले तितकचं चर्चेत राहिलं चे त्यांचं खासगी आयुष्य. याचं मुख्य कारण ठरले राज बब्बर. विवाहीत राज बब्बर यांच्यासोबत स्मिता पाटिल यांचं प्रेम जुळलं आणि दोघांनी लग्नही केलं.


शेवटची इच्छा...
28 नोव्हेंबर 1986मध्ये मुलगा प्रतीकचा जन्म झाल्यानंतर काहीच दिवसांत म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मृतदेह एखाद्या सवाष्ण स्त्रीप्रमाणे सजवला जावा अशी स्मिता यांची इच्छा होती. त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनीच त्यांच्या मृतदेहाचा दुल्हन सारखा मेकअप केला होता.

Web Title- Smita Patil Birthday Special Article


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com