
WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला. पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. या महत्त्वाच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. तब्बल २७ वर्षांनी त्यांनी दुसरी आयसीसी ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमावली आहे. याआधी १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.
इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत २१२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ १३८ धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखले. तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी २१३ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २१२ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज फेल झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने खेळ सावरत ६६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ब्यू वेबस्टर ऑस्ट्रेलियासाठी खास ठरला. त्याच्या ७२ धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा दबदबा राहिला. रबाडाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या पाठोपाठ मार्को जॉन्सनने ३ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची खराब सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर ही लवकर माघारी परतले. कॅप्टन बावुमा ३६ धावांवर बाद झाला, तर डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ १३८ धावांवर कोलमडला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने क्लास दाखवत ६ गडी बाद केले.
पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आला. यावेळेसही दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरले. मार्नस लबूशेनने २२ धावा, स्टीव्ह स्मिथने १३ धावा केल्या. सुरुवातीला लागोपाठ विकेट पडल्यानंतर ॲलेक्स कॅरी (४३ धावा) आणि पॅट कमिन्स (५८ धावा) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २०० पार गेला. ऑस्ट्रेलियाचा संघ २०७ धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने पुन्हा ४ विकेट्स घेतल्या.
सलामीसाठी एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन मैदानात उतरले. रिकल्टन ६ धावा करुन माघारी परतला. वियान मुल्डर २७ धावांवर बाद झाला. टेम्बा बावुमा आणि एडन मारक्रम यांनी दमदार भागीदारी केली. तिसरा दिवस संपेपर्यंत, मारक्रमने शतकीय खेळी केली, तर टेम्बा बावुमाने ६५ धावा केल्या. चौथ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेसमोर ६९ धावांचे लक्ष होते. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ६६ धावांवर टेबा बावुमा बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ट्रिस्टन स्टब्सची देखील विकेट पडली. त्यानंतर डेव्हिड वेडिंगहॅम आणि एडन मारक्रम यांनी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.