आशिया चषक २०२३ स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल हा स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर राहणार आहे.
बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
केएल राहुलबाबत मोठी अपडेट आली समोर...
बीसीसीआयने ट्विट करत म्हटले आहे की, 'केएल राहुलची प्रगती फार वेगाने होत आहे. मात्र तो आशिया चषकातील सुरूवातीच्या २ सामन्यांमधून तो बाहेर राहणार आहे.'ही माहिती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना २ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. या सामन्यानंतर भारतीय संघ नेपाळ संघाविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये उपलब्ध नसणार आहे.
आयपीएल स्पर्धेदरम्यान झाली होती दुखापत...
केएल राहुल हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत तो लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या स्पर्धेतील एका सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता.
त्यामुळे त्याला गेले काही महीने मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. आता दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र मैदानात खेळण्यासाठी उतरायला त्याला आणखी वाट पााहावी लागणार आहे.
केएल राहुल दुखापतग्रस्त असतानाही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. यावरून आता निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.