IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. लंडनच्या द ओव्हलच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. या सामन्यात शुभमन गिलची विकेट चर्चेचा विषय ठरली.
या विकेटमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं. अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मते देखील मांडली. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलच्या विकेटबाबत भाष्य केलं आहे.
हा सामना झाल्यानंतर रोहित शर्माला शुभमन गिलच्या वादग्रस्त झेलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'त्यांनी ३ ते ४ वेळा पाहिला आणि आपला निर्णय कळवला. हा निर्णय खूप लवकर घेतला गेला. ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला होता, ते पाहता १०० टक्के खात्री असल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हा अंतिम सामना होता. तसेच हा सामना निर्णायक वळणावर येऊन पोहोचला होता.'
तसेच तो पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी हा झेल टिपला गेला त्यावेळी केवळ एक दोन अँगल दाखवण्यात आले. आयपीएलमध्ये १० अँगल असतात. मला हेच कळालं नाही, जागतिक स्तरावरील स्पर्धेत अल्ट्रा मोशन नाही, झूम इमेज दिसली नाही.' (Latest sports updates)
शुभमन गिलची विकेट..
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरूवात करून दिली होती.
त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाकडून ८ वे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला होता. त्यावेळी स्कॉट बोलँडने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर शुभमन गिलने हलक्या हाताने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेंडू बॅटचा कडा घेत, स्लिपमध्ये असलेल्या कॅमरुन ग्रीनच्या हातात गेला. झेल टिपताच त्याला बाद घोषित केलं गेलं होतं. मात्र झेल व्यवस्थितरित्या टिपला गेला आहे की नाही, हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरकडे निर्णयाची निर्णय पाठवण्यात आला होता. त्यावेळी थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.