
Rohit Sharma Leg Injury: सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकूण ५ कसोटी सामन्यांपैकी चौथा कसोटी सामना हा मेलबर्न येथे २६ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला. पुढे गाबावरील तिसरा सामना अनिर्णित राहिला. एकूणच कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असल्याचे लक्षात येते. याउलट भारतीय संघ कांगारुंविरोधात काहीसा मागे पडला आहे. अशातच भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुखापतग्रस्त झाल्याचे म्हटले जात आहे.
मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी सराव करताना रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. रोहित हा थ्रोडाऊन स्पेशालिस्टसोबत फलंदाजीचा सराव करत होता. सराव सत्र सुरु असताना चेंडू रोहितच्या डाव्या पायाच्या पॅडमध्ये घुसला आणि गुडघ्यावर जोरात आदळला. दुखापत झाल्यानंतर सराव कक्षात रोहित गुडघ्याला बर्फ लावून शेक देत असताना दिसला. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन रोहित सराव कक्षातून बाहेर पडला.
विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५ मध्ये आपले स्थान अढळ करण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पुढील दोन सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निकालावरुन भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार की नाही हे ठरणार आहे. अशात रोहित शर्माची दुखापत ही भारतीय संघासाठी काळजीचे कारण बनले आहे.
भारतीय संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज के.एल.राहुल देखील सराव करताना दुखापतग्रस्त झाला होता. सरावादरम्यान त्याच्या हातावर चेंडू बसल्याने हाताला जोरदार मार लागला होता. त्याने लगेचच संघाच्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन उपचार घेतले होते. दुखापत झाल्यानंतर तो काही काळ अस्वस्थ अवस्थेत दिसत होता. असे असले तरीही, बीसीसीआयने या दोन्ही दुखापतींबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
मेलबर्नचा कसोटी सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. भारताने मेलबर्नमध्ये आतापर्यंत १४ कसोटी सामना खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला, तर ८ सामन्यांत संघाला हार पत्करावी लागली. उरलेले २ सामने हे निर्णायक ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.