प्रदीर्घ कालावधीपासून भारतीय क्रीडा संस्कृतीत कबड्डी हा सर्वाधिक खेळला जाणारा व प्रतिसाद मिळणारा क्रीडा प्रकार राहिला आहे. आज संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना प्रदीप नरवाल आणि मनिंदर सिंग या प्रो कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंनी डिस्नी स्टार आणि युवा अनस्टॉपेबल यांनी पाठिंबा दिलेल्या मुंबई पब्लिक स्कूल या शासकीय शाळेच्या ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेल्या प्रदीप व मनिंदर यांनी ध्वजारोहणानंतर शाळेच्या कबड्डी संघाबरोबर मनोरंजनात्मक कबड्डी सत्रात सहभाग घेतला. तसेच त्यांनी शाळेला व शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक भेटवस्तूही दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
याप्रसंगी प्रदीप नरवाल म्हणाला की, 'कबड्डी हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा घटक असून तो स्वातंत्र्यपूर्वीही प्राचीन काळापासून खेळला जातो. इतक्या मुलांना मोठ्या संख्येने आजही कबड्डीत रस घेताना पाहून मला आनंद झाला आहे. त्यांच्याबरोबर ध्वजारोहण समारंभात भाग घेऊन मला खूप बरं वाटलंय सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनिंदर सिंग याप्रसंगी म्हणाला की, 'देशाच्या कानाकोपऱ्यात कबड्डी हा खेळ खेळला जातो आणि ही परंपरा शेकडो वर्षे अशीच कायम राहील अशी माझी खात्री आहे. कबड्डी हा भारतातील नागरिकांच्या जणू रक्तातच असून त्यांचे आम्हाला मिळणारे प्रेम व पाठिंबा यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. कबड्डी या खेळाचा सर्वांगीण विकास घडवून आणल्याबद्दल प्रो कबड्डी लीग संयोजकांनाही धन्यवाद. सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.'
गेल्या चार वर्षांपासून डिस्ने स्टार व युवा अन् स्टॉपेबल आपल्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातल्या शासकीय शाळांमधील विद्यार्थांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत.
स्कूल ट्रान्सफॉरमेशन प्रोग्राम या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट घडवून आणणे तसेच वॉश सपोर्ट, स्टेम लॅब, डिजिटल क्लासरूम आधुनिक क्रीडा सुविधा, ग्रंथालये, सौरऊर्जा यांच्या सहाय्याने शालेय शिक्षण संस्कृती समृध्द करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरण पूरक शाळा उभारून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने मुंबई, दिल्ली, गुरगाव, बेंगळुरू, कोची, इझिलम, कोठा मंगलम, कोलकत्ता, त्रिवेंद्रम हैद्राबाद चेन्नई व आणखी अनेक शहरांमधील शाळांपर्यंत हा प्रकल्प नेला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.