पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावण्यासाठी भारतीय खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येत आहेत. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. या पदकाने भारतीय खेळाडूंच्या ऊर्जेत भर घातली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मनूने सरबजोत सिंगसोबत मिळून भारताला शूटिंगमध्ये आणखी एक पदक मिळवून दिलं. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताला शूटिंगमध्ये आणखी एक पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे.
स्वप्नील कुसळेने पात्रता फेरीतील सामन्यात ५९० गुणांची कमाई केली. यासह तो सातव्या क्रमांकावर राहिला. टॉप ८ खेळाडूंना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळते. या प्रकारातील अंतिम फेरीतील सामन्याला १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे.
स्वप्नील कुसळेचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यामुळे या स्तरावर पोहचण्यापर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. स्वप्नीलचे वडील कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याला लहानपणापासूनच खेळांकडे आकर्षण होतं. त्यामुळे त्याने क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रवेश मिळवला. सुरुवातीला त्याने इतर खेळांवरही हात आजमावून पाहिला. मात्र त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला नेमबाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
नेमबाजी हा महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. कारण शुटिंगच्या शस्त्रासाठी लागणाऱ्या परवाण्यासह महागड्या बुलेट्स खरेदी कराव्या लागतात. ज्यावेळी त्याने सुरुवात केली होती, त्यावेळी बुलेट्सची किंमत साधारण १५० रुपये होती. ५०० बुलेट्सने रोजचा सराव करायचं म्हटलं, तर एकूण खर्च हा ७५ हजारांच्या घरात होता.
स्वप्नीलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी पतसंस्थेतून कर्ज घेतलं. शूटिंगमध्ये कारकिर्द करु पाहणाऱ्या स्वप्नीलने सरावासह रेल्वेत टीसीची नोकरीही केली. शेवटी त्याने आपल्या मेहनत आणि जिद्दीने इजिप्तमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चौथं स्थान मिळवलं. यासह त्याने ऑलिंपिक पात्रता मिळवली. त्यानंतर २०२४ मध्ये ट्रायल्स झाले. या ट्रायल्समध्ये शानदार कामगिरी करत त्याने भारताच्या नेमबाजी संघात स्थान मिळवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.