पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris olympics 2024) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ६ पदकं पटकावली आहेत. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ५७ किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात एकतर्फी पराभव झाल्यानंतर अमन सेहरावतने (Aman Seherawat) प्युएर्तो रोकोच्या डॅरियन क्रूझला आस्मान दाखवत शानदार विजय मिळवला. या विजयानंतर त्याने इतिहास रचला आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पदक जिंकणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
सध्या कुस्तीपटू विनेश फोगाटचं प्रकरण तुफान गाजतंय. विनेशने ५० किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात वर्ल्ड नंबर १ खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. फायनलच्या सामन्यापूर्वी तिचं वजन अचानक वाढलं होतं. तिने अतोनात प्रयत्न केले. मात्र अंतिम वजन करताना तिचं वज न १०० ग्रॅम अधिक असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे अधिकृतरित्या तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं होतं. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यापूर्वी अमन सेहरावतचं वजनही वाढलं होतं. मात्र त्याने रात्रभर मेहनत घेतली आणि सामन्यापूर्वी आपलं वजन नियंत्रणात आणलं. अन्यथा त्यालाही अपात्र ठरवण्यात आलं असतं.
अमन सेहरावत गुरुवारी आपला सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी अखाड्यात उतरला. या सामन्यात त्याला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना जिंकून त्याला सुवर्ण किंवा कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभूत झाल्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी कांस्यपदकाचा सामना खेळायचा होता.
सेमीफायनलच्या सामन्यानंतर त्याचं वजन ६१.५ किलो इतकं झालं होतं. म्हणजेच ४.५ किलो अधिक वजन. हे वजन त्याला ५७ किलोंपर्यंत आणायचं होतं. यासाठी त्याच्याकडे केवळ १० तास होते. या कालावधीत त्याला ४.५ किलो वजन कमी करायचं होतं. जर या १० तासात अमनला ४.५ किलो वजन कमी करता आलं नसतं, तर विनेश प्रमाणेच भारताचं हक्काचं कांस्यपदकही निसटलं असतं.
सेमीफायनलचा सामना झाल्यानंतर अमनकडे वजन कमी करण्यासाठी पूर्ण एक रात्र होती. दुसऱ्या दिवशी त्याचं वजन होणार होतं. रात्री १२:३० वाजतात तो जिममध्ये गेला आणि एक तास पूर्ण तो ट्रेडमिलवर धावत होता. त्यानंतर त्याने ५ मिनिटांचा सौना बाथ घेतला. हा बाथ घेऊनही त्याचं वजन ९०० ग्रॅम अधिक होतं. त्यानंतर त्याने मसाज केला आणइ जॉगिंग केली ज्यामुळे त्याचं १०० ग्रॅम वजन कमी झालं. रात्रभर कसून मेहनत केल्यानंतर पहाटे ४:३० वाजता त्याचं वजन १०० ग्रॅम कमी म्हणजेच ५६.९ किलो पर्यंत पोहोचलं. त्यामुळे अमनला आणि प्रशिक्षकांनाही दिलासा मिळाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.