भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. बंगळुरूत पार पडलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
आता पुण्यात पर पडलेल्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने कसोटी मालिका २-० ने गमावली आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारतीय संघाने मायदेशात खेळताना कसोटी मालिका गमावली आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ' जर भारतात खेळताना तुमचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे, तर पराभवानंतर तुमच्या पराभवाची चर्चा होणारच. न्यूझीलंडने ज्या पद्धतीने खेळ करून दाखवला आहे, ते खरच कौतुकास्पद आहे. इथे फिरकीपटूंचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. गेल्या एक दशकापासूनचा रेकॉर्ड पाहिला तर, आम्ही फिरकी गोलंदाजांच्या बळावर खेळतोय. टॉस जिंका ३०० धावा करा.'
या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना टिकून फलंदाजी करता आलेली नाही. सरफराज खान हा भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १७० धावा केल्या आहेत.
मात्र मुख्य बाब म्हणजे त्याने एकाच डावात १५० धावा केल्या होत्या. म्हणजे उरलेल्या ३ डावात त्याने केवळ २० धावा केल्या आहेत. तर यशस्वी जयस्वालने १५५ धावा केल्या आहेत. रिषभ पंतला २ सामन्यांमध्ये १३७ धावा करता आल्या आहेत. तर विराटला अवघ्या ८८ धावा करता आल्या आहेत. रोहितलाही एकही मोठी खेळी करता आलेली नाही.
भारताने ही मालिका तर गमावली आहे. मात्र तिसरा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण WTC च्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर पुढील सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. हा सामना १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.