टीम इंडिया आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 12 ऑगस्टपासून लंडनच्या लॉर्ड्स (Lord's Cricket Ground) मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीस संघाने (Team India) आतापर्यंत या मैदानावर 18 पैकी फक्त 2 कसोटी जिंकल्या आहेत. या दोन्ही विजयांचा आणि भारताने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषकांचा एक विचित्र योगायोग आहे.
भारतीय संघाने 5 जून 1986 ला लॉर्ड्सवर पहिली कसोटी जिंकली. त्या कसोटी सामन्यात कपिल देव च्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला होता. भारतीय संघाने या विजयाच्या बरोबर 3 वर्षांपूर्वी 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही (1983 World Cup) जिंकला होता. या कसोटीत कर्णधार कपिल देवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. त्याने दोन्ही डावांमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात नाबाद 23 धावा केल्याने संघ विजयी झाला होता.
तेव्हाचा भारतीय संघ त्यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तीन वर्षांपूर्वी वर्ल्ड कपचा अंतिम सामना 25 जून 1983 ला लॉर्ड्सवरच खेळला गेला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाने दुसरी कसोटी आजपासून बरोबर 7 वर्षापुर्वी म्हणजे 17 जुलै 2014 रोजी जिंकली होती. तेव्हा भारतीय संघाने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात 95 धावांनी सामना जिंकला होता. या सामन्यात भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने 7 बळी घेतले होते. लॅार्ड्सवर खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 2 सामन्यात भारताने विजय नोंदवला आहे. आता कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला तिसरा सामना जिंकण्याची संधी असणार आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test) नॉटिंगहॅममध्ये खेळला गेला, जो अनिर्णित राहिला. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, इंग्लंडने भारतीय संघाला 209 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेटसाठी 52 धावा केल्या. 5 व्या दिवशी विजयाची अपेक्षा होती, पण पावसाने खेळ होऊ शकला नव्हता.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.