Political Explainer: अब की बार ४०० पार, PM मोदींचं स्वप्न होणार का साकार? काय आहे राजकीय परिस्थिती? जाणून घ्या

Political Explainer: संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित केला. 400 जागांच्या विजयासह 2024 मध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Political Explainer
Political ExplainerSaam Digital
Published On

Political Explainer

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप 370 जागा आणि एनडीए 400 जागा जिंकेल असा भाजपला विश्वास आहे. मात्र राम मंदिरानंतर देशात भाजपचा जनाधार वाढला असला तरी हे लक्ष्य गाठणं तितकं सोप असणार नाही. नरेंद्र मोदींची जादू उत्तरेकडील राज्यांमध्ये कायम असली तरी दक्षिणेत मोदींचा करिष्मा अद्याप चाललेला नाही. अशा राजकीय स्थितीत दक्षिणेत लोकसभेच्या जागा जिंकल्याशिवाय एनडीएचं 400 चं स्वप्न कसं पूर्ण होणार? हा प्रश्न आहे.

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित केला. 2024 मध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी किमान 100-125 दिवस शिल्लक आहेत. आकडेवारीच नाही देशाचा मूडही भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे देशाची जनता एनडीएच्या ४०० जागा निवडून देईल. देशासाठी आणि भाजपसाठी दिसरी टर्म महत्त्वाची असेल. कारण टर्ममध्ये मोठे निर्णय घेतले जातील आणि हे निर्णय पुढच्या हजार वर्षांचा पाया मजबूत करतील. यात जनतेचं सहकार्य गरजेचं असून १४० कोटी देशवासीयांच्या क्षमतेवर अपार विश्वास असल्याचं मोदींनी म्हटलं होतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएने 336 आकडा पार केला होता. यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या तर एनडीए आघाडीचा आकडा 350 च्या पुढे गेला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पीएम मोदींनी भाजपसाठी 370 जागा आणि एनडीएला 400 जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र त्यासाठी भाजपला 2019 च्या तुलनेत ६७ जागा अधिक जिंकाव्या लागणार आहेत. भाजपने याचं गणित कसं मांडलं आहे? कोणत्या राज्यात भाजप आणि मित्रपक्षांना फायदा होईल? कुठे राजकीय नुकसान होईल याविषयी जाणून घेणार आहोत.

हिंदी भाषिक पट्ट्यात वर्चस्व

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये 193 जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजपकडे सध्या 177 जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजपला संख्याबळ राखण्याचचं नाही तर जागा वाढवण्याचंही आव्हान असणार आहे. तसंच सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर उत्तर भारतातील या 11 राज्यांमध्ये भाजप अधिक जागा जिंकण्याची शक्यता कमी आहे.

तर महाराष्ट्र,प. बंगाल, आसाम, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 2019 च्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीची 2024 च्या निवडणुकीत पुनरावृत्ती करावी लागेल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प. बंगालमध्ये 18, महाराष्ट्रात 23, कर्नाटकात 25 आणि गुजरातमध्ये सर्व 26 जागा जिंकल्या होत्या. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 2024 च्या निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची अपेक्षा आहे. दक्षिणेत, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपमधील 131 जागांपैकी भाजपला 2019 मध्ये केवळ 30 जागा जिंकता आल्या. त्यातील २५ जागा एकट्या कर्नाटकमधील आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे. सध्या कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या २५ जागा राखण्याचं आव्हान असणार आहे.

पंजाब वगळता उर्वरित राज्यांमध्ये भाजपची स्थिती चांगली

2014 आणि 2019 ची निवडणूक जिंकल्यानंतर भाजप आता 2024 मध्येही पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे. काश्मीर ते बिहार या पट्ट्यात २४५ जागा आहेत, ज्यामध्ये पंजाब वगळता उर्वरित राज्यांमध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. असं असलं तरी उत्तर भारतातील या पट्ट्यातील सर्व जागा जिंकणं सोपं नाही, मात्र २०१९ च्या तुलनेत जागा वाढू शकतात.

400 चा टप्पा ओलांडण्यासाठी एनडीएला केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये अधिक जागा जिंकून आणाव्या लागतील. कारण या राज्यांमध्ये भाजपला विजयाची संधी आहे. गुजरात, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपकडे आधीच सर्वाधिक जागा आहेत. बिहारमध्ये पुन्हा जेडीयूला सोबत घेतल्यामुळे 2019 प्रमाणे सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ज्या राज्यांमध्ये जागा वाढवण्याची संधी आहे, तिथे भाजने रणनिती आखली तर भाजपला 400 चा आकडा गाठणं सोपं जाणार आहे.

सपा, बसपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास फायदा?

उत्तर प्रदेशमध्ये, भाजप युतीने 2019 मध्ये लोकसभेच्या 80 पैकी 64 जागा जिंकल्या होत्या आणि 16 जागांवर त्यांचा पराभव झाला होता. यावेळी सपा आणि बसपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचा फायदा भाजपला मिळू शकतो. 2014 मध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या आणि मित्रपक्षाने 2 जागा जिंकल्या होत्या. पुन्हा भाजपला त्याच निकालाची अपेक्षा आहे आणि भाजपने त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू केले असून 8 ते 10 जागा अधिक निवडून आणण्याची संधी आहे.

Political Explainer
Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत समान नागरी विधेयक सादर, सत्ताधारी आमदारांच्या सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा

दक्षिणेकडील राज्यांमध्ये आव्हान

400 चा टप्पा ओलांडण्यासाठी एनडीएला तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विजय मिळवावा लागेल. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 104 जागा आहेत, त्यापैकी तेलंगणामध्ये भाजपला फक्त चार जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकमध्ये भाजपने जेडीएससोबत युती करून राज्यात २९ जागा जिंकण्याची तयारी केली आहे. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजपने पुन्हा एकदा टीडीपी आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेची एकही जागा नसल्यामुळे खाते उघडण्याचं आव्हान असेल. तर तेलंगणात भाजपला किमान 8 जागांवर विजय मिळवावा लागेल.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता थलपथी विजयने तामिळनाडूमध्ये तमिझगा वेत्री कळघम नावाचा राजकीय पक्ष सुरू केला आहे. भाजपचीही नजर दक्षिणेतील सिनेतारकांवर आहे. ज्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरू शकतं. अलीकडेच केरळमध्ये पंतप्रधान मोदींनी अभिनेता-राजकारणी सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती आणि वधू-वरांना आशीर्वाद दिले होते. त्यामुळे केरळमधून भाजप सुरेश गोपी यांना उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये 8-8 आणि 10-10 जागा जिंकण्यात यश आलं तर भाजप ४०० चं लक्ष्य सहज गाठू शकेल.

ईशान्येकडील राज्यांवर नजर

ईशान्येकडील तसेच ओडिशा आणि बंगालमध्ये जागा टिकवून ठेवण्याचे नाही तर ते वाढवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. 2019 मध्ये ओडिशामध्ये 21 पैकी 8 जागा जिंकण्यात भाजपला यश आले होतं. मात्र यावेळी 10 ते 12 पर्यंत जागा वाढवण्याचं लक्ष्य असून मोदींनी त्या दृष्टीकोणातून ओडिशात दौरे सुरू केले आहेत. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी 18 जागा जिंकण्यात यश आलं होतं. ईशान्येकडील राज्यातही भाजपच्या विस्ताराला वाव आहे. पण नवीन पटनायक आणि ममता बॅनर्जी यांचं आव्हान असणार आहे.

ईशान्येकडील राज्यांतील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी सध्या 11 जागा भाजपकडे आहेत. मात्र प्रादेशिक पक्षांमुळे फक्त आसाममध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे. आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागांपैकी भाजपकडे 9 जागा असून ३ ते ४ जागा वाढू शकतात. अरुणाचल, मेघालय आणि त्रिपुरासह ईशान्येकडील सर्व 25 जागा राखण्याचा भाजप युतीचा प्रयत्न आहे.

Political Explainer
Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत समान नागरी विधेयक सादर, सत्ताधारी आमदारांच्या सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com