अंबरनाथ : केंद्र सरकारनं ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचं निगमीकरण करून सात नव्या महामंडळांची स्थापना केलीये. आता या सात महामंडळांकडून देशातील ४१ ऑर्डनन्स फॅक्टरीजचा कारभार चालवला जाणार आहे. देशाच्या सैन्याला लागणारी युद्धसामुग्री तयार करण्याचं काम ऑर्डनन्स फॅक्टरीजच्या माध्यमातून केलं जातं. यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशातील ४१ ठिकाणी असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीजचा कारभार चालवला जात होता.
हे देखील पहा :
मात्र, आता केंद्र सरकारनं ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचं विसर्जन करत सात नव्या महामंडळांची स्थापना केली आहे. ज्यामध्ये म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड वेहिकल निगम लिमिटेड, ऍडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड, ट्रूप कम्फर्ट इंडिया लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड, इंडिया ऑपटेल लिमिटेड आणि ग्लायडर्स इंडिया लिमिटेड या सात महामंडळांचा समावेश आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत या महामंडळांची घोषणा आणि उद्घाटन सुद्धा केलं.
अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आणि मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी हे दोन कारखाने आहेत. यापैकी ऑर्डनन्स फॅक्टरीत दारुगोळा, तर एमटीपीएफ कारखान्यात सैन्यासाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण वाहनं आणि अन्य तांत्रिक सामुग्री तयार केली जाते. यापैकी ऑर्डनन्स फॅक्टरी ही आता यंत्र इंडिया लिमिटेडच्या अखत्यारीत असेल. तर एमटीपीएफ कारखाना हा आता आर्मर्ड वेहिकल निगम लिमिटेड या महामंडळाचा भाग असेल. देशातील ४१ कारखान्यांची या ७ महामंडळांमध्ये विभागणी करण्यात आली असून हे खासगीकरण नव्हे, तर कॉर्पोरेटीकरण असल्याची माहिती अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे अस्थायी प्रभारी अधिकारी पी. के. गुप्ता यांनी दिली आहे.
अंबरनाथच्या आयुध निर्माणीतील दोन कारखान्यात मिळून जवळपास २ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कॉर्पोरेटीकरणाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या धोरणावर कोणताही परिणाम होणार नसून उलट कारखान्यांची निर्माण आणि उत्पादन क्षमता वाढून नव्या संधी येतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होतोय.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.