मोठी बातमी! नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी

नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे.
ED raid National Herald office
ED raid National Herald officeSaam TV

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळच्या सुमारास ईडीने हे कार्यालयावर धाड टाकली असल्याची माहिती आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीनंतर आता ईडीने ही छापेमारी केली आहे.

ED raid National Herald office
एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री; राऊतांच्या वक्तव्याने नवा वाद?

नॅशनल हेराल्डप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना चौकशी सुद्धा करण्यात आली. सोनिया गांधी यांची सलग तीनवेळा चौकशी करण्यात आली होती. दरम्यान चौकशी झाल्यानंतर आता ईडीने नॅशनल हेराल्डच्या दिल्ली येथील कार्यालयावर आज सकाळीच छापेमारी केली.

काय आहे प्रकरण?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 20 नोव्हेंबर 1937 साली असोसिएटेड जर्नल लिमिटेडची स्थापना केली. विविध भाषांमध्ये वर्तमानपत्रे प्रकाशित करणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड, हिंदीमध्ये नवजीवन आणि उर्दूमध्ये कौमी आवाज ही वृत्तपत्रे एजेएल अंतर्गत प्रकाशित झाली.

AJL च्या निर्मितीमध्ये नेहरू यांची प्रमुख भूमिका होती. परंतु, ते कधीही त्यांच्या मालकीचे नव्हते. कारण, जवळपास 5000 स्वातंत्र्यसैनिक या कंपनीला पाठिंबा देत होते आणि ते शेअर होल्डरही होते. 90 च्या दशकात ही वृत्तपत्रे तोट्यात जाऊ लागली. 2008 पर्यंत एजेएलवर 90 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. यानंतर वर्तमानपत्र प्रकाशित न करण्याचा निर्णय एजेएलने घेतला. एजेएल मालमत्ता व्यवसायात उतरले.

वादाची सुरूवात कुठून झाली?

2010 मध्ये एजेएलचे 1,057 भागधारक होते. नुकसान होत असताना त्याचे होल्डिंग यंग इंडिया लिमिटेड म्हणजेच वायआयएलकडे हस्तांतरित करण्यात आले. यंग इंडिया लिमिटेडची स्थापना 2010 मध्ये झाली. यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची कंपनीत 76 टक्के भागिदारी आहे. उर्वरित 24 टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (दोघेही निधन झाले आहेत) यांच्याकडे होते.

अनेक भागधारकांनी केला आरोप

दरम्यान, माजी कायदा मंत्री शांती भूषण, अलाहाबाद आणि मद्रास उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्यासह भागधारकांनी आरोप केला की वायआयएलने एजेएल अधिग्रहित केले तेव्हा कोणतीही सूचना दिली नाही. शेअर्सचे हस्तांतरण करण्यापूर्वी भागधारकांची संमतीही घेतली नाही. शांती भूषण आणि मार्कंडेय काटजू यांच्या वडिलांचे एजेएलमध्ये शेअर्स होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com