Shrikant Shinde News : महाराष्ट्रात गेले दीड वर्ष हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात होतं. देशद्रोहाचे आरोप लावले जात होते. दुर्दैवाची बाब म्हणजे संपूर्ण देशात हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री असताना ही गोष्ट घडली. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचा वारसा घेऊन पुढे जाणारे आहोत.
त्यामुळे आम्ही त्या भ्रष्ट आघाडीतून बाहेर पडलो, असा घणाघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केला. विशेष म्हणजे संपूर्ण सभागृहासमोर त्यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवली. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते.
मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. त्या ठरावावर मंगळवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेकडून या अविश्वासाच्या ठरावाविरोधात भाषण करण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे बोलले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. नवनीत राणा यांच्याविरोधात त्या वेळी कारवाई झाली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या घटनेचा उल्लेख करताना लोकसभेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली. तसेच स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्यांच्या राज्यात हनुमान चालिसा पठण केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. देशद्रोहाचा गु्न्हा दाखल झाला, ही दुर्दैवी घटना आहे, असंही ते म्हणाले.
अविश्वासाचा प्रस्ताव मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल आहे. त्या सर्व घटनांचा निषेध आहेच. त्या घटना दुर्दैवी आहेत. पण गेल्या दहा वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे, ही वस्तुस्थिती असल्याचं शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेबाबत प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसने गेल्या ६५ वर्षांमध्ये ईशान्य भारतात झालेल्या हिंसेचं उत्तर आधी द्यायला हवं. गेली ६५ वर्षं काँग्रेसने ईशान्य भारताला वाऱ्यावर सोडलं होतं. आता तिथल्या जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे. काँग्रेसला हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी केला.
सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. पण या स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या, वेळोवेळी त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणाऱ्यांसोबत राज्यातील काही जण गेले. त्यांच्या मांडीवरच जाऊन बसले. खुद्द बाळासाहेब ठाकरे सावरकरांच्या विचारांना मानत होते. पण त्यांच्या वारसदारांनी तेवढाही विधिनिषेध न ठेवता जागा बदलली, अशी टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली. (No Confidence Motion)
मागील मुख्यमंत्री अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाही
गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात एक अनोखा विक्रम झाला. राज्याचा मुख्यमंत्री गेल्या अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेला नाही. हे घरी बसून होते, त्यामुळे त्यांना पायाभूत सुविधांची, विकासकामांचीही काही पडली नव्हती. अडीच वर्षांत सर्व लोकोपयोगी प्रकल्पांची कामं ठप्प होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तातडीने सर्व प्रकल्प मार्गी लावायला सुरुवात झाली, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
मोदी पुन्हा येणार
अविश्वासाचा प्रस्ताव २०२३ मध्ये येईल, हे भाकीत मोदींनी आधीच केलं होतं. २०१८ मध्येही असाच अविश्वासाचा प्रस्ताव विरोधकांनी आणला होता. अर्थातच तो फेटाळला गेला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत NDA च्या खासदारांची संख्या ३५३ वर पोहोचली. २०१४ मध्ये ही संख्या ३३६ होती. आता पुन्हा निवडणुकीच्या वर्षभर आधी हा अविश्वासाचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली NDA सरकारच निवडून येईल. एवढंच नाही, यावेळी आमच्या खासदारांची संख्या ४०० पेक्षा जास्त असेल, असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.