इंडोनेशियाच्या पामतेल बंदीमुळे भारतीयांचे बजेट बिघडणार; साबण, शाम्पू, बिस्किटे महागणार!

इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाच्या (Palm Oil) निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
इंडोनेशियाच्या पामतेल बंदीमुळे भारतीयांचे बजेट बिघडणार; साबण, शाम्पू, बिस्किटे महागणार!
इंडोनेशियाच्या पामतेल बंदीमुळे भारतीयांचे बजेट बिघडणार; साबण, शाम्पू, बिस्किटे महागणार!SaamTvNews

इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाच्या (Palm Oil) निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे, जी गुरुवारपासून लागू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतात स्वयंपाकाचे तेल आणि पॅकेज्ड फूडच्या किमती वाढू शकतात. याशिवाय साबण, शाम्पू, नूडल्स, बिस्किटे ते चॉकलेटच्या किमतीतही (Prices) वाढ होऊ शकते कारण हे पदार्थ बनवण्यासाठी पामतेलाचा कच्चा माल म्हणून वापर जातो. इंडोनेशिया संपूर्ण जगात सर्वाधिक पाम तेल निर्यात करतो. अशा परिस्थितीत इंडोनेशियातून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने त्याचा पुरवठा कमी होईल. ज्यामुळे जगभरात पामतेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. पाम तेलाच्या किमती वाढल्याने त्या उद्योगांची किंमतही वाढेल, ज्यामध्ये हे तेल कच्चा माल (Raw Material) म्हणून वापरले जाते.

भारत (India) हा जगातील पाम तेलासह खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारत दरवर्षी परदेशातून सुमारे 13.5 कोटी खाद्यतेल खरेदी करतो. यापैकी 80 ते 85 लाख टन (एकूण आयातीच्या 63 टक्के) पामतेल आहे. भारत आपल्या पाम तेलाच्या आवश्यकतेपैकी 45 टक्के इंडोनेशियाकडून (Indonesia) आणि उर्वरित शेजारील देश मलेशियाकडून (Malaysia) खरेदी करतो. साधारणपणे, भारत दरवर्षी इंडोनेशियाकडून सुमारे 4 दशलक्ष टन पाम तेल खरेदी करतो.

इंडोनेशियाने गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर पुढील एका आठवड्यात त्याची किंमत 5 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही महिन्यांत पामतेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती जगाला वाटत आहे. स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले, “पाम तेल आणि त्यातील डेरिव्हेटिव्ह्जचा वापर साबण, शाम्पू, बिस्किटे आणि नूडल्स यासारख्या अनेक दैनंदिन वस्तूंमध्ये केला जातो. हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, ब्रिटानिया, गोदरेज कंझ्युमर, प्रोडक्ट्ड्स लि., मॅरिको लिमिटेड सारख्या फास्ट-मुव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांवर या तेलबंदीचा नकारात्मक परिणाम होणार आहे. इनपुट कॉस्ट वाढल्याने, खाद्यपदार्थ, साबण आणि इतर वैयक्तिक काळजी उत्पादनांच्या निर्मात्यांना उत्पादनांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

बंदीनंतर येणाऱ्या आव्हानांविषयी बोलताना पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले की, केवळ खाद्यपदार्थ कंपन्यांवरच नव्हे, तर एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांवरही याचा नकारात्मक परिणाम होईल. तसेच येणारा काळ हा खूप आव्हानात्मक असणार आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने एका अहवालात म्हटले आहे की पाम तेलावरील बंदीमुळे दबाव वाढेल आणि हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज ग्राहक, ब्रिटानिया आणि नेस्ले यांच्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरेल. "इंडोनेशियाच्या निर्णयामुळे केवळ पाम तेलाच्या उपलब्धतेवरच नव्हे तर जगभरातील वनस्पती तेलाच्या उपलब्धतेवर परिणाम होईल," असे जेम्स फ्राय, कमोडिटी कन्सल्टन्सी फर्म, LMC इंटरनॅशनलचे अध्यक्ष म्हणाले.

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEI) चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी या बंदीला आश्चर्यकारक पाऊल म्हटले आहे आणि त्यामुळे भारतातील तसेच जगभरातील ग्राहकांना त्रास होईल असे म्हटले आहे. "आमच्या देशांतर्गत बाजारपेठेवर याचा गंभीर परिणाम होईल कारण आमची अर्धी पाम तेलाची गरज इंडोनेशियामधून येते आणि इतर कोणीही हि गरज इतक्या लवकर भागवू शकत नाही."

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी का घातली?

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी म्हटले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदी कायम राहील. खरं तर, इंडोनेशियामध्ये खाद्यतेलाच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. पामतेलाच्या पुरवठ्यात होणारा तुटवडा हे कारण आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी विडोडोने खाद्यतेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com