
China–India relations : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा चीनचा दौरा आणि तिथं भारतासोबत काम करण्याची चीननं दाखवलेली तयारी यामुळं विस्तवही जात नसलेल्या या दोन देशांची युती होतेय, अशी चर्चा जगभरात सुरू झालीय. खरंच दोन्ही देशांमध्ये जवळीक वाढतेय का? भारताविरोधात नेहमी बेडकुळ्या फुगवणाऱ्या चीन इतका नरमला कसा? त्यामागे नेमका काय आणि कुणाचा फायदा आहे?
शेजाऱ्यांचं कधीच एकमेकांशी पटत नाही, मग ती माणसं असोत की राष्ट्र! भारत आणि चीन या दोन देशांचंही तसंच आहे. दोन्ही देशांचे संबंध असे ताणले गेले की दोघांमध्ये विस्तवही जात नाही. पण शेवटी शेजारीच ते. कोणत्या न कोणत्या मुद्द्यावर लगेच विचार जुळतात. भांडणं मिटतात. दुरावा कमी होतो. पुन्हा ते एक होतात. तसंच काहीसं झालंय भारत आणि चीनचं.
अलीकडेच भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यावर परस्पर सहमती झालीय. भारताचे परराष्ट्र मंत्री यांचा नुकताच चीनचा दौरा झाला. त्यावेळी चीननं पहिली टाळी देत दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला. भारतासोबत मिळून-मिसळून काम करण्यास आम्ही तयार आहोत, असं चीनकडून सांगण्यात आलं. त्यानंतर अख्ख्या जगाचं लक्ष आशियातील या दोन शक्तिशाली देशांच्या भागीदारीकडं लागलं आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंधांमधील नव्याने होत असलेले बदल हे जगात होऊ घातलेल्या राजनैतिक आणि आर्थिक परिवर्तनांमुळं घडून आले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनची राजधानी बीजिंगला गेले होते. २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या झटापटीनंतरचा जयशंकर यांचा हा पहिला चीन दौरा होता.
दोन्ही देशांमधील तणावानंतर नव्याने संबंध सुधारण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असं या चीनच्या दौऱ्याकडं बघितलं जात आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी भारताच्या अजेंड्याला अंतिम स्वरुप देण्याचा उद्देश जयशंकर यांच्या चीन दौऱ्यामागे होता, हे स्पष्ट झालं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेत सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे.
भारत आणि चीन या दोन देशांकडं आता अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे. अलीकडच्या घटनाक्रमावर जाणकारही लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व घटना-घडामोडी बघता हा एक नवा रोडमॅप तयार झाल्याचं दिसून येतं. जयशंकर यांचा चीन दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. हा दौरा द्विपक्षीय संबंधांना वेगाने चालना देणारा आहे. त्यात संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे अलीकडील चीन दौरे हे दोन्ही देशांमध्ये तयार होत असलेल्या नव्या रोडमॅपच्या दृष्टीकोनातून बघितले जात आहेत. त्यात एससीओ हे एक समांतर राजनैतिक व्यासपीठ ठरत आहे.
ही द्विपक्षीय चर्चा सीमावादापलीकडची आहे. त्यामागे जागतिक राजनैतिक बदल, विशेषतः चीनचं रेयर अर्थ एलीमेंट धोरण. चीननं या घटकांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दुसरीकडं भारताकडून मेक इन इंडिया धोरण आक्रमक पद्धतीनं पुढे नेलं जात आहे. त्यासाठी हे घटक केवळ इलेक्ट्रिक वाहनं आणि स्मार्टफोनच नाहीत, क्षेपणास्त्र प्रणालीसारख्या लष्करी साधनांसाठीही अत्यंत गरजेचं आहे. चीन हा व्हिसा सुविधा आणि थेट उड्डाणांसाठी कमालीचा उत्सुक आहे. तर भारत हा 'रेयर अर्थ एलीमेंट'च्या पुर्ततेसाठी प्रयत्नशील आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार विशेषतः चीनमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या तज्ज्ञांनुसार, भारत-चीन यांचे संबंध सुधारण्याच्या दिशेने हे जे सकारात्मक पाऊल पडलेले आहे, त्यामागे केवळ दोन देशांमधील तणाव मिटवणेच नव्हे तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. व्यापार असो किंवा राजनैतिक सहकार्य असो वा सांस्कृतिक, दोन्ही देशांनी कधीच द्विपक्षीय चर्चा बंद केलेली नाही. कैलास मानसरोवर यात्रेला परवानगी आणि थेट हवाई संपर्काचे प्रयत्न यातून द्विपक्षीय संबंधांत सुधारणा होईल असे संकेत मिळत असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जवळीक वाढत असल्याचे संकेत आहेत. ही जवळीक अमेरिकेमुळं वाढतेय असे मानले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ धोरण हे यामागचं कारण असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. त्यांच्या मतांनुसार, चीन या मुद्द्यावर अमेरिकेसोबत थेट पंगा घेत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा दबाव कमी करण्यासाठी चीन सहयोगी देशांच्या एकजुटीचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडं भारताकडूनही याबाबत थेट चर्चा केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.