Viral Video : लग्न म्हटलं की गडबड गोधळ आलाच. लग्नसराईचा (Wedding) हंगाम सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वरातीत नाचताना नवरदेवाचे मित्र राडा घालतात, तर कधी मानपान देण्यावरून वधू-वर मंडळींमध्ये हमरीतुमरी होते. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडीओ (Viral Video) तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत नवरदेव चक्क नवरीला एकटं सोडून पळ काढत असल्याचं दिसतंय. (Husband wife Viral Video)
प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचं समजतंय. येथील नवादा जिल्ह्यातल्या माहुली गावातील गुड्डी कुमारी नामक तरुणीचे संदीप कुमार नामक तरुणाशी प्रेमसंबंध होते. अनेकदा ते लपून छपून भेटत असतं. गुरूवारी (1 ऑक्टोबर) संदीप कुमार हा गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला होता. त्यावेळी गुड्डीच्या कुटुंबातील एका सदस्याने दोघांना एकत्र बघितलं.
त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचीही विचारपूस केली असता, आपले एकमेकांवर प्रेम असल्याचं त्यांनी कबूल केलं. मग काय गुड्डीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. संदीप कुमारला त्यांनी लग्नासाठी तयार केलं. सुरूवातीला संदीपचा लग्नाला विरोध होता. मात्र, त्यानंतर त्याने होकार दिला. (Marriage Viral Video)
दोघांच्याही होकारानंतर गुड्डीचे कुटुंबीय दोघांना घेऊन कोर्ट मॅरेज करण्यासाठी न्यायालय परिसरात गेले. तिथे वकिलांनी मॅरेज पेपरवर गुड्डीची सही घेतली. जेव्हा संदीपची सही करण्याची वेळ आली, तेव्हा त्याने मला लग्न करायचे नाही असं म्हणत हातातला पेन फेकला आणि तेथून धूम ठोकली. संदीप पळत असल्याचं बघून गुड्डीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या हाताला झटका देत पळून गेला.
दरम्यान, होणारा जावई पळून जात असल्याचं बघून गुड्डीच्या वडिलांसह कुटुंबीयांनी संदीपचा पाठलाग केला. भररस्त्यात झालेल्या या ड्राम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, संदीप पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुड्डीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने धूम ठोकली. दरम्यान, गुड्डीच्या कुटुंबीयांनी पाठलाग करत संदीपला पकडलं. त्यानंतर त्यांचा विवाह लावून देण्यात आला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.