ऑस्ट्रेलियाची सरकार 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. तरुणांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी सांगितले. हा नियम मोडणाऱ्यांवर कडक शिक्षेची घोषणाही केली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या युगात सोशल मिडिया हा मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, परंतू त्यातून येणारी मानसिक आणि भावनिक आव्हाने तसेच वेळेचा अपव्यय याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने मुलांचा खऱ्या जगाशी असलेला संबंध कमकुवत होत चालला आहे. ते खेळ खेळण्यात, मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत घालवू शकतील तो वेळ पडद्यासमोर वाया जातो. वास्तविक नातेसंबंध जोडण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांना आत्मविश्वास आणि चांगली सामाजिक कौशल्ये देतो. जर त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवले तर कदाचित ते अधिक निरोगी मार्गाने वास्तविक जगाशी संपर्क साधू शकतील.
सोशल मीडियाच्या वापरामुळे 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी संसदेत कायदा मांडण्याचे आश्वासन दिले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे दाखविण्याची जबाबदारी असेल की ते हा प्रवेश रोखण्यासाठी योग्य पावले उचलत आहेत. ही जबाबदारी तरुण किंवा पालकांवर असणार नाही. वापरकर्त्यांसाठी कोणतीही कारवाई करण्याची तरतूद नाही असे अँथनी अल्बानीज म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी, वेळेचे व्यवस्थापन आणि त्यांच्या भविष्यासाठी हा सकारात्मक पाऊल ठरु शकतो. मुलांना निरोगी आणि सकारात्मक वातावरण देणे हा त्यांच्या खऱ्या संगोपनाचा एक भाग आहे आणि या पाऊलामुळे बालपण आनंदी होऊ शकते.
Written By: Dhanshri Shintre.