भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
मला संधी दिल्यास बारामतीचा आतापेक्षा जास्त विकास करणार असल्याचं सांगत युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. मात्र अजित पवारांच्या उमेदवारीबाबत संदिग्धता असतानाच युगेंद्र पवारांनी शरद पवारांकडून घेण्यात येत असलेल्या मुलाखतीला दांडी मारलीय. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात कोण? याविषयी चर्चा रंगलीय.
तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीचा चेंडू पवारांच्या कोर्टात टाकलाय. याचबद्दल बोलताना रहात पवार म्हणाले आहेत की, बारामती खास असल्याने वेळ लागणार. तर याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीचा निर्णय आठवडाभरात होणार.
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांकडून सातत्याने बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यातच आता कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवत उमेदवारीसाठी राडा केला. तर प्रफुल्ल पटेलांनी बारामतीतून अजित पवारांची उमेदवारी जाहीर केलीय. मात्र त्यानंतरही बारामतीतून इच्छूकांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली. मात्र यामागे शरद पवारांचीच रणनीती असल्याची चर्चा रंगलीय. ही रणनीती जाणून घेऊ...
अजित पवार यांची चाल पाहून शरद पवार डाव टाकणार असल्याचं दिसत आहे. अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच शरद पवार उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अंदाज घेऊन युगेंद्र पवार की अन्य कुणी? याचा निर्णय घेण्यात येईल, असं सूत्रांचा म्हणणं आहे. पवार कुटुंबातील सामना टाळण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, अजित पवार शिरुरमधून लढण्याच्या चर्चा रंगल्यात. त्यातच अजित पवारांकडून उमेदवारीबाबत ठोस भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे शरद पवारांनी सावध भूमिका घेतलीय. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना रंगणार की वेगळा खेळ पाहायला मिळणार याची उत्सुकता ताणली गेलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.