राज्यात पाणी टंचाई; धरणांमध्ये केवळ ३७ टक्के जलसाठा शिल्लक

राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईग्रस्त भागात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.
Water scarcity
Water scarcity Saam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : सध्या उन्हाळ्याच्या (Summer) तीव्र झळांचा सामना सर्वांना करावा लागत आहे, अशातच या उन्हामुळे आता सर्वांना पाणी टंचाईला देखील सामोंर जावं लागणार आहे. कारण, राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के जलसाठा शिल्लक असून पाण्याची कमतरता असलेल्या भागात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत असल्याचं देखील शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण 36.27 टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त (Water scarcity) भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात 1924 दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या 47.22 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात 3 हजार 327 दलघमी म्हणजे 45.13 टक्के, कोकण विभागात 1567 दलघमी म्हणजे 44.65 टक्के, नागपूर विभागात 1620 दलघमी म्हणजे 35.18 टक्के, नाशिक ‍विभागात 2138 दलघमी म्हणजे 35.62 टक्के तर पुणे विभागात 4381 दलघमी म्हणजे 28.8 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

Water scarcity
कोरोना पुन्हा वाढतोय, मास्क वापरा; मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात 155 गावांना आणि 499 वाड्यांना 101 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात 117 गावे, 199 वाड्यांना 102 टँकर्स, पुणे विभागात 71 गावे आणि 360 वाड्यांना 70 टँकर्स, औरंगाबाद विभागात 43 गावे, 23 वाड्यांना 59 टँकर्स, अमरावती विभागात 69 गावांना 69 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये 53ने आणि वाड्यांमध्ये 116 ने वाढ झालेली आहे. तसेच टँकर्समध्ये 46 ने वाढ झालेली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण 401 टँकर्समध्ये 89 शासकीय आणि 312 खाजगी टँकर्सचा समावेश असल्याची देखील शासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com