मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. निवडणुकीसाठी एकेक आमदाराच्या मताला मोठं महत्व आलं आहे. राज्यसभेत बसलेला फटका लक्षात घेता महाविकास आघाडीने यावेळी दगाफटका होऊ नये म्हणून दोन दिवसांपूर्वीच सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. मतदान कसं करायचं याबाबत त्यांना सूचना दिल्या जात आहे. अशातच आघाडीचं टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची मतं भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. (Vidhan Parishad Election Bahujan Vikas Aaghadi Latest Marathi News)
हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची मते मिळवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरणार असंच दिसत आहे. कारण, बहुजन विकास आघाडीची मतं ही भाजपला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर हे अमेरिकेला रवाना झाल्यामुळे बविआच्या 3 मतांपैकी 2 मतं ही भाजपला मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरारमध्ये फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग झाल्याचं दिसत नाहीये. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. हीच भूमिका आता विधानपरिषद निवडणुकीतही महत्वाची ठरणार आहे. अशातच बविआचे 3 पैकी 2 मतं भाजपला जाणार असल्यानं विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीला फटका बसण्याची चिन्ह आहे.
विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?
विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण 27 आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण 113 आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या 4 जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे 54 आमदार, शिवसेनेकडे 56 आमदार आणि काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.