Vasant More: राज ठाकरेंची नाराजी, वसंत मोरेंना पदावरून हटवलं

वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू असून, त्यांना पदावरून हटवले.
Vasant More resentment persists?
Vasant More resentment persists? Saam Tv

सुशांत सावंत

पुणे : गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी घेतलेली वेगळी भूमिका आणि विविध पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अशा वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत. त्यात वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू असून, त्यांना पदावरून हटवले. राज ठाकरे यांच्या आदेशानं नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे.

MNS
MNSसुशांत सावंत

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं भाजपच्या काही नेत्यांकडून स्वागत होत असतानाच, मनसेमधील मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुणे आणि इतर भागांत काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.

हे देखील पहा-

दुसरीकडे, राज ठाकरेंच्या भूमिकेला मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी समर्थन दिले नव्हते. त्यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली होती. आपल्याला प्रभागात शांतता हवी असून, लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका अडचणीत आणणारी असल्याचे मत त्यांनी मांडले होते. आपल्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नसल्याचे ते म्हणाले होते. यावरून राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. तसेच राज ठाकरेंची ठाण्यात सभा होणार आहे. त्या सभेलाही मोरेंना निमंत्रण नव्हतं. आता राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चेला आता दुजोरा मिळाला आहे. वसंत मोरे यांना मनसे शहराध्यक्षपदावरून हटवले आहे. त्या पदावर नगरसेवक साईनाथ बाबर यांची निवड केली आहे.

इतर पदाधिकारी काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पुणे मनसेत नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी कुठलीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, असं बाबू वागसकर यांनी स्पष्ट केलं होतं. ९ तारखेला जी सभा आहे, त्याबाबत आज बैठक झाली. कोणत्या राज्यात त्या-त्या न्यायालयांनी काय निर्णय दिले, याबाबत आमची लीगल टीम समजून घेईल. आमचे सर्वांशी बोलणे झाले आहे. राज ठाकरेंची जी भूमिका आहे, त्यावर आम्ही ठाम आहोत, असेही ते म्हणाले होते. कोर्टात भोंग्यांबाबत जे निर्णय झाले, त्याबाबत चर्चा झाली असून, आणखी काय करता येईल, हे आम्ही बघत आहोत, असे किशोर शिंदे म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com